Breaking News

घुमरी येथे तरुणाचा गळफास मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट


मिरजगाव/ प्रतिनिधी ः
कर्जत तालुक्यात घुमरी येथे हनुमंत अंकुश गाडे (वय 20) यांनी गळफास घेतला. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला.
 हनुमंत मिरजगाव येथील दरवाजा फ्रेम बनवण्याच्या दुकानात कामगार म्हणून काम करत होता. तो कामावरून सुट्टी घेऊन सायंकाळी घुमरी येथे घरी निघून गेला. परंतु घरी पोहचलाच नाही. रंगपंचमी असल्याने उशीर झाला असेल असे त्याच्या कुटुंबियांना वाटत होते. परंतु रात्रीचे 10 वाजले तरी मुलगा घरी आला नाही म्हणून त्याला शोधत मिरजगावच्या दिशेने त्याचे कुटुंबिय निघाले. तेव्हा घरापासून काही अंतरावर रस्त्यावरच असलेल्या कडुलिंबाच्या झाडावर कोणतरी लटकलेले दिसले. जवळ जावून पाहिले असता हनुमंतचा मृतदेह लटकत होता. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळलेले नाही.
    या घटनेची माहिती घुमरी येथील पोलिस पाटील रमेश पांडुळे यांनी पोलिसांना दिली. यानंतर मिरजगाव दूरक्षेत्राचे हवालदार ज्ञानदेव गर्जे, प्रबोध हंशे, श्यामसुंदर जाधव घटनास्थळी गेले.
 यानंतर मृतदेह झाडावरुन खाली उतरवून शवविच्छेदन करण्यासाठी कर्जत येथे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. पुढील तपास कर्जत पोलिस अधीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रल्हाद लोखंडे करत आहेत. त्याच्यावर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.