Breaking News

पुणे-नाशिक महामार्गावर शिवशाही बस पेटली संगमनेर/प्रतिनिधी
 नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या शिवशाही बसला अचानक भीषण आग लागली. आज (गुरुवार) सकाळी साडेआठच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटाच्या पायथ्याशी आनंदवाडी शिवारात ही घटना घडली. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले.
 गुरुवारी शिवशाही बस (क्रमांक एम एच १४ जी यू २४४५) ही नाशिकहून पुण्याकडे जात होती. बस सकाळी संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटाच्या पायथ्याशी आनंदवाडी शिवारातून आली असता बसने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे समजताच चालकाने तत्काळ रस्त्याच्या कडेला बस घेऊन बसमधील प्रवाशांना खाली उतरण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान घटना निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी बचावकार्यासाठी धाव घेतली. अग्निशामक पाचारण करण्यात आले. महामार्ग पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील वाहतूक बंद केली होती.
बसला लागलेल्या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. खरेतर शिवशाही बस म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची रुबाबदार ओळख. खासगी कंपन्यांसोबतच्या स्पर्धेला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी या बसची निर्मिती करण्यात आली. परंतू, बसची ओळख प्रवासी आणि जनमानसात अधिक दृढ होण्याऐवजी भलत्याच कारणासाठी ही बस सेवा चर्चेत असते. कधी बसचा अपघात होतो. कधी बस रस्त्यात मध्येच बंद पडते तर, कधी चालती बस अचानक पेट घेते. त्यामुळे सेवेपेक्षा इतरच कारणांमुळे बससेवा चर्चेत असते.