Breaking News

कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही : डॉ. अल्पा दलाल


मुंबई : जगात कोरोनाची साथ आली म्हणून घाबरून जाण्याचे कारण नाही. या साथीचा मुकाबला करण्यासाठी आपण सज्ज असले पाहिजे. भारतात टीबीमुळे रोज 1400 लोक दगावतात. पण त्याचे कुणाला काहीच वाटत नाही. कोरोनाने मात्र लोकांमध्ये भीती निर्माण केली आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध श्‍वसन रोग तज्ज्ञ डॉ. अल्पा दलाल यांनी केले.
मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी प्रारंभी डॉ. अल्पा दलाल यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला. गेली 15 वर्षे डॉ. अल्पा दलाल या शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयात मानद डॉक्टर म्हणून समर्पितपणे काम करीत असून त्यांचे हे कार्य वाखाणण्याजोगे आहे, अशा शब्दांत वाबळे यांनी डॉ. अल्पा दलाल यांचा गौरव केला. कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही असे ठामपणे सांगताना डॉ. दलाल म्हणाल्या की, हा आजार टाळण्यासाठी लोकांनी आवश्यक ती काळजी घ्यायला हवी. एखाद्या संशयित रुग्णापासून किमान तीन मीटर दूर राहणे, दिवसातून काही वेळ सूर्यप्रकाशात वावरणे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविणे, यामुळे कोरोनाची धार कमी करता येऊ शकते. भारत हा मधूमेहाच्या बाबतीत आघाडीवर आहे. मधूमेहामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते. पण मधूमेहाकडेच दुर्लक्ष केले जाते. आपली जीवनशैली बदलणे, किमान सात तास झोप यामुळे देखील रोगप्रतिबंधक शक्ती वाढविता येऊ शकते, असे त्या म्हणाल्या. आहार आणि व्यायाम हे सुदृढ राहण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे घटक असल्याचे त्यांनी सांगितले. विश्‍वस्त अजय वैद्य यांनी आभार मानले.