Breaking News

देशात रविवारी ‘जनता कर्फ्यू’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा ; अत्यावश्यक सेवांना वगळले


नवी दिल्ली ः देशात करोनाने चार जणांना करोना व्हायरच्या संसर्गानं प्राण गमवावा लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत, देशभरात रविवारी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू लागू करत असल्याची घोषणा केली आहे.
यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जनता कर्फ्यूची मागणी मी आज देशवासीयांकडे करतो आहे. जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध त्याचे पालन प्रत्येक नागरिकाने याचे पालन करावे अशी मागणी मी करतो आहे. 22 मार्चला सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत कुणीही बाहेर पडू नये असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे असेही मोदींनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारांनीही हा आदेश पाळावा असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. अद्याप करोनावर कोणतीही लस शोधण्यात आलेली नाही. तसंच काही उपायही शोधण्यात आलेला नाही. त्यामुळे देशवासियांची चिंता वाढणं स्वाभाविक आहे. जगातल्या ज्या देशांमध्ये करोना व्हायरस आणि त्याचा प्रभाव जास्त आहे तिथे अचानक करोनाचं संकट गहिरं झालं आहे. करोनाग्रस्तांची संख्या त्या देशांमध्ये वेगाने वाढली आहे. भारत सरकार या स्थितीबाबत नजर ठेवून आहे. भारताची लोकसंख्या 130 कोटीच्या घरात आहे. आपण विकासासाठी प्रयत्नशील देश आहोत. आपल्या देशावर आलेलं हे संकट साधंसुधं नाही असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. प्रत्येकाने संयम ठेवला पाहिजे आणि संकल्प केला पाहिजे की केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशांचे पालन करु. करोना नावाच्या संकटाने जगाला ग्रासले आहे. जगातल्या सगळ्या मानवजातीला करोनाचा त्रास होतो आहे. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धाच्या वेळीही जगातल्या सगळ्या देशांवर इतका गंभीर परिणाम झाला नव्हता जेवढा करोनामुळे होतो आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.