Breaking News

हक्काच्या निवार्‍यासाठी महिलांचा आक्रोश

अहमदनगर/ प्रतिनिधी : मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनात सहभागी असलेल्या महिलांनी निवार्‍याचा मूलभूत अधिकार मिळण्यासाठी महिला दिनी हुतात्मा स्मारकात आक्रोश केला. तसेच समाजातील जातीय विषमता नष्ट होण्यासाठी राष्ट्रीय जाती निब्बाण खुल्या विद्यापीठाचे प्रस्ताव पूजन करण्यात आले. 
पंतप्रधान आवास योजनेची घोषणा झाल्यापासून मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या माध्यमातून स्वत:च्या मालकीचे घर नसलेल्या महिला हक्काच्या निवार्‍यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहे. अनेक वेळा पाठपुरावा करुन देखील शासनाने आंदोलनाची दखल घेतलेली नाही. मनपाच्या माध्यमातून देण्यात येणारे घरकुल महाग असून, लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजनेचा वापर करुन सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत घरे उपलब्ध करुन देण्याची संघटनेची आग्रही मागणी आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महिला दिनी हक्काच्या निवार्‍यासाठी महिलांनी आक्रोश केला.
यावेळी भारतातील सामाजिक आणि आर्थिक विषमतेमुळे बहुसंख्य नागरिक मानसिक आणि आर्थिक गुलामगिरीत आहेत. जातीव्यवस्था, स्त्रियांना दुय्यम दर्जा आणि मतदास्य टिकून आहेत. समाजातील जातीदास्य, स्त्रीदास्य व मतदास्य कायमचे हद्दपार करण्यासाठी जातीनिब्बाण खुल्या विद्यापीठाचे प्रस्ताव पूजन करण्यात आले असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अंबिका जाधव, संगीता साळुंके, आशा जंगले, नम्रता कांगुणे, हिराबाई शेकटकर, बाळासाहेब शेकटकर, उषा निमसे, फरिदा शेख, लीला रासने, सुनीता साबळे, शारदा जग्गम, लता शिंदे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.