Breaking News

पाण्यासाठी जामखेडकर रस्त्यावर
 जामखेड/प्रतिनिधी
 जामखेड शहरातील पाणी टंचाई तीव्र झाली आहे. शहरातील खर्डा रोड भागातील सिद्धार्थ नगर व साठे नगर भागातील नागरिक मागील अडीच महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. आक्रमक झालेल्या नागरिकांनी गुरूवारी नागरपालिकेकच्या भोंगळ कारभाराविरोधात शिर्डी - हैद्राबाद मार्गावर तीन तास रस्ता रोको करत नागरपालिएकचा निषेध नोंदवला. नगरपालिकेने तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी अश्वासन दिल्यानंतर अंदोलन मागे घेण्यात आले.
 जामखेड शहरातून जाणाऱ्या शिर्डी - हैद्राबाद महामार्गावरील खर्डा रोड परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने खर्डा चौक ते लक्ष्मीआई चौक या परिसरात गटारीचे काम चालू असल्यामुळे या भागातील साठेनगर व सिध्दार्थनगर या भागाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन तुटली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या भागातील पाणीपुरवठा खंडीत झाला होता. दोन महिन्यांपासून या भागातील नागरिकांकडून पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नगरपालिकेकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या त्याची दखल पालिकेकडून घेतली जात नव्हती.
 आज (गुरुवार)शहरातील सिध्दार्थनगर व साठेनगर भागातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले यांच्या नेतृत्वाखाली सकाळी खर्डा रोड भागात शिर्डी - हैद्राबाद महामार्गावरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सर्कल परिसरात सकाळी अकरा वाजता रास्ता रोको अंदोलन केले. यावेळी अंदोलक महिलांनी आमच्या हक्काचे पाणी द्या अशा घोषणा देत उन्हात तब्बल तीन तास हे अंदोलन केले. अंदोलनामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी  नागरपालिकेशी संपर्क करून अंदोलकांची यशस्वी चर्चा केली. नगरपालिकेचे कर्मचारी गिते यांनी तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी टँकरची उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर अंदोलन मागे घेण्यात आले.
 या अंदोलनात सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, दादा घायतडक, प्रमोद सदाफुले, किशोर कांबळे, रवी सोनवणे,मनीष घायतडक,अक्षय घायतडक, अमोल सोनवणे, संगीता घायतडक, अनिता निकाळजे, स्वाती घायतडक, वैशाली सदाफुले, बेबी गायकवाड, उषा सदाफुले आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या.