Breaking News

भाजपकडून डॉ. कराड, तर शिवसेनेकडून चतुर्वेदींना उमेदवारी राज्यसभेसाठी घोषणा ; खडसेंचा पत्ता पुन्हा कट


मुंबई ः राज्यातील राज्यसभेच्या रिक्त सात जागांसाठी निवडणूक होत असून, भाजपकडून आपल्या तिसर्‍या उमेदवारीची घोषणा गुरुवारी करण्यात आली आहे. डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुन्हा एकदा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना डावलण्यात आले आहे.
तर दुसरीकडे वर्षभरापूर्वीच शिवसेनेत दाखल झालेल्या डॉ. प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे सेनेतील अनेक निष्ठावंत नाराज झाले आहेत. महाराष्ट्रात राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या 26 मार्चला निवडणूक होणार आहे. विधानसभेतील पक्षीय बलानुसार भाजपच्या वाट्याला 3 जागा येत आहेत. भाजपकडून बुधवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि सातार्‍याचे माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तिसर्‍या जागेसाठी भाजप कोणाला उमेदवारी देणार, याबद्दल उत्सुकता होती. तिसर्‍या जागेसाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव चर्चेत होते. केंद्रीय नेतृत्त्वाला आम्ही एकनाथ खडसे यांचे नाव सुचविले आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सांगितले होते. पण गुरुवारी अचानकपणे तिसर्‍या जागेसाठी डॉ. भागवत कराड यांचे नाव जाहीर करण्यात आले. डॉ. भागवत कराड हे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी विधानभवनामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रियांका चतुर्वेदी काँग्रेसमधून शिवसेनेत आल्या होत्या. शिवसेनेने त्यांना उपनेता पद देत त्यांच्याकडे प्रवक्तापदाची जबाबदारी सोपविली. 2019 मधील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यातील सोशल मीडियातील कलगीतुर्‍यात प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेनेची बाजू खंबीरपणे मांडली होती. प्रियांका चतुर्वेदी ट्विटरवर कायम सक्रिय असतात. वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयांवर त्या आपले मत ट्विटच्या माध्यमातून मांडत असतात. केंद्रातील भाजपच्या सरकावरही त्या ट्विटच्या माध्यमातून टीका करीत असतात. शिवसेनेकडून राज्यसभेच्या एका जागेसाठी चंद्रकांत खैरे, दिवाकर रावते यांची नावे चर्चेत होती. पण पक्षाने ऐनवेळी या दोन्ही जुन्या नेत्यांना डावलून वर्षभरापूर्वी पक्षात आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी देणे पसंद केले.


 
मला अपेक्षाच नव्हती! खडसे

राज्यसभेसाठी चर्चेत असलेले एकनाथ खडसे यांना पक्षानं पुन्हा संधी नाकारली आहे. त्यावर खडसे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.’राज्यसभेच्या उमेदवारीसाठी माझ्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती हे खरं आहे. मात्र, मलाच तशी अपेक्षा नव्हती,’ अशा मोजक्या शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.