Breaking News

शिर्डीतील भाविकांना लाडू ऐवजी मास्क द्यावेत पोळ यांची कोल्हे यांच्याकडे मागणी


कोपरगाव/ तालुका प्रतिनिधी ः
शिर्डी संस्थानने भाविकांना प्रसाद म्हणून लाडू देण्याऐवजी मास्क द्यावेत, अशी मागणी लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन पोळ यांनी केली. त्यांनी याबाबत साईबाबा संस्थानचे उपाध्यक्ष बिपीन कोल्हे यांना निवेदन दिले.
या निवेदनात पोळ यांनी म्हटले आहे की, शिर्डी हे जागतिक दर्जाचे धार्मिक स्थळ आहे. देश, विदेशातून अनेक भाविक शिर्डी येथे दर्शनासाठी येत असतात. देशभर करोना आजार रौद्ररूप धारण करत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आले.
साईबाबा यांनी अनेक रुग्णांची सेवा केली. त्यांच्या विचारातूनच संस्थानने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी केली आहे. शिर्डी मध्ये विमान, रेल्वे व दुचाकीने अनेक भाविक देश, विदेशातून येत असतात.
संस्थानच्या हॉस्पिटलमार्फत शिर्डीच्या हद्दीवर रेल्वे स्टेशन व विमानतळावर भाविकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी तात्पुरते चेक पोस्ट उभे करावे. त्यामुळे भाविकांना या आजारापासून सुटका मिळेल. या भाविकांना दर्शन रांगेत प्रसाद म्हणून लाडू पुरविले जातात. त्याऐवजी करोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांना लाडूऐवजी मास्क पुरवावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. कोल्हे यांनी ही बाब संस्थानच्या ट्रस्टींकडे मांडावी असेही या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर लोक स्वराज्य आंदोलनाचे सोमनाथ म्हस्के, किरण अढांगळे, सुजल चंदनशिव,राजू रोकडे, दीपक कांबळे, गोपीनाथ ताते, बाळासाहेब पवार, मोनू म्हस्के, किरण सोळासे, नाना बत्तीसे, गीतेश पोळ, राकेश कांबळे आदींच्या सह्या आहेत.