Breaking News

जीवन विकासासाठी संशोधनाला दिशा गरजेची डॉ. युगंधर यांचे प्रतिपादनकोपरगाव/ प्रतिनिधी ः
मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी संशोधनातील नावीन्यपूर्ण कल्पना, दृष्टिकोन आणि दिशा ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन तेलंगणा काकतीय विद्यापीठाचे डॉ.टी. युगंंधर यांनी केले.
कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष छबुराव आव्हाड होते.
डॉ. युगंधर म्हणाले, आज तंत्रज्ञान, ज्ञान, सामाजिकशास्त्रे आणि भाषा अशा सर्वच क्षेत्रामध्ये मूलभूत व मौलिक संशोधन सातत्याने सुरु आहे. आपल्या भारतीय संशोधकांना हे आव्हानात्मक क्षेत्र आहे. जगातील संशोधनात भारतीय संशोधकांचा मोलाचा वाटा आहे, असेही ते म्हणाले.
चर्चासत्रात रिसेंट ट्रेंडस् इन रिसर्च या विषयावर विज्ञान, वाणिज्य व कलाशाखेंतर्गत तीन सत्रे पार पडली. पहिल्या सत्रात रा. ब. ना. बोरावके कॉलेजचे डॉ. शरद शेळके यांनी दैनंदिन जीवनात पडणार्‍या प्रश्‍नांचा प्रथम शोध घ्यायला शिका. निर्माण झालेली समस्या हीच संशोधनाची जननी असते, असे आवाहन संशोधक व विद्यार्थ्यांना केले.
विविध इंडस्ट्री, वाहन उत्पादने, पर्यावरण, सुक्ष्म तंत्रज्ञान, कृषिक्षेत्रमधील संशोधनात्मक आढावा घेत आजच्या काळातील नावीन्यपूर्ण व आवश्यक संशोधनक्षेत्राविषयी शेळकेंनी मार्गदर्शन केले. द्वितीय व तृतीय सत्रामध्ये न्यू आर्टस, कॉमर्स, सायन्स कॉलेजचे डॉ. डी. के. मोटे यांनी वाणिज्य या सर्वव्यापक शाखेतील संशोधनाच्या नव्या दिशा स्पष्ट केल्या. संशोधनाची आजची स्थिती, गती त्यांनी स्पष्ट केली. जगभरात उदयाला येत असलेल्या वाणिज्य संकल्पना घटना व घडामोडी इत्यादींचा शोध व वेध घेणे या संशोधनाच्या नव्या दिशा आहेत, असे ते म्हणाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्तीचे बीज पदवी शिक्षण व अभ्यासक्रमातच रुजले पाहिजे, असे म्हटले. बदलते समाज जीवन व जीवनशैली यामुळे समाजशास्त्रे, भाषा व कला, समाजमाध्यमे यात होत जाणारे बदल यामुळे संशोधनासमोर नवी आव्हाने उभी होत राहतात. त्यातूनच संशोधनात नवीन संकल्पना, पद्धती व प्रवाह निर्माण होतात. त्यांची दखल अभ्यासक विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे, असे सागडे म्हणाले.
वैष्णवी कलेढोणकर आणि शिवनाथ तक्ते यांनी शोध निबंध सादरीकरण केले. सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. बाळासाहेब शेंडगे आणि प्राचार्य डॉ. विजया गुरसळ यांनी भूषवले. विविध महाविद्यालयातून डॉ. झरेकर, छाया शिंदे, विठ्ठल कडूस, प्रदीप झोळ, योगेश शिंदे, दिनेश घुगे, व्ही.बी. फोडे, एस. एस.आढाव हे संशोधक उपस्थित होते. डॉ. निर्मला कुलकर्णी, अमित काळे, डॉ. सुनीता शिंदे यांनी आभार मानले. उमाकांत कदम, विशाल पोटे, स्वाती अबक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.