Breaking News

अमेरिकेसह 13 राष्ट्रांना भारत देणार हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन

नवी दिल्ली ः कोरोना विषाणूबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरत असलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध कोणत्या राष्ट्रांना निर्यात करावे, याची पहिली यादी भारताकडून जाहीर करण्यात आली आहे. भारताने पहिल्या यादीत 13 राष्ट्रांना प्राधान्य दिले आहे. यात अमेरिकेसोबतच स्पेन, जर्मनी, बहरिन, ब्राझील, नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान, मालदिव, बांगलादेश,  सेशेल्स, मॉरिसिस आणि डोमिनिकन रिपब्लिक या राष्ट्रांचा समावेश आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणामध्ये जीवरक्षक म्हणून समजल्या जाणार्‍या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि पॅरासिटामॉल या दोन औषधांच्या निर्यातीवर भारत सरकारने बंदी घातली होती. त्यानंतर अमेरिकेने भारताच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थितीत केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला द्विपक्षीय कराराची आठवण करुन देत तंबी वजा इशारा देत निर्यातीवरील बंदीवर नाराजी व्यक्त केली. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या आक्रमक भूमिकेनंतर भारताने या औषधांवरील निर्यातीची बंदी शिथिल केली होती. भारताने मलेरियाविरोधक हायड्रोक्सिक्लोरोक्विनच्या निर्यातीवरील बंदी आंशिकरित्या हटवल्याचे जाहीर करताना म्हटले होते की, देशांतर्गत गरजेला प्राधान्य देऊन माणूकीच्या नात्याने कोरोना विषाणूने प्रभावित देशांच्या मागणीनुसार हायड्रोक्सिक्लोरिक्विन औषधाच्या पूर्ततेबाबत निर्णय घेतला जाईल. त्यानंतर आता भारताने ठराविक देशांची यादी जाहीर करत कोणत्या राष्ट्रांना औषधाचा पुरवठा करणार याची माहिती दिली आहे.