Breaking News

राज्यात करोना बाधितांचा आकडा 1,666 वर

शनिवारी 92 नव्या रुग्णांची भर 
मुंबई - राज्यात कोरोना बाधितांचा आकडा हा आता 1,666 वर पोहोचला आहे. शनिवारी दुपारपर्यंतची ही आकडेवारी आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात दुपारपर्यंत 92 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यातील सर्वाधिक 72 रुग्ण हे मुंबईतील आहेत. 
राज्यात मुंबईत रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे म्हणून करोना विषाणूच्या संसर्गातून पूर्णपणे बरे झालेल्या आणि डिस्चार्ज मिळालेल्या  रुग्णांवरही लक्ष ठेवण्याचे आणि त्यांच्या तब्येतीचा फॉलोअप घेण्याचे आदेश मुंबई महानगर पालिकेने दिले आहेत. पालिकेने 24 वॉर्डना डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांचा पाठपुरावा करण्यासाठी एक विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. करोनातून पूर्णपणे बर्‍या झालेल्या व्यक्तींमध्ये या रोगाची लक्षणे पुन्हा आढळली असल्याची कोणतीही केस अद्याप समोर आलेली नाही तरीही खबरदारीचा उपाय म्हणून 24 विभागातील करोना रुग्णांचा पूर्ण फॉलोअप घेण्याचे आदेश स्थानिक अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.
देशात करोनाचा फास दिवसेंदिवस अधिक घट्ट होऊ लागला आहे़ देशात 7 हजार 447 जणांना कोरोना बाधित झाले असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी 246 जणांचा मृत्य झाला आहे़ त्याचवेळी 764 जण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. देशात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आता करोनाच्या सामुहिक संसर्गाला सुरुवात झाली असल्याचा निष्कर्ष आयसीएमआर च्या ताज्या अहवालावरुन काढण्यात येत आहे. मात्र, अजूनही सामुहिक संसर्गाला सुरुवात झाली नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे. गेल्या 24 तासात देशात करोनामुळे 40 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1035 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. देशात आतापर्यंत 246 जणांचा मृत्यू झाला आहे तर देशातील एकूण करोनाबधितांची संख्या 7447 वर जाऊन पोहचली आहे. देशामध्ये सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्रात असून येथे 1 हजार 666 जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी एकट्या मुंबईमध्ये हा आकडा 1 हजार 8 वर पोहचला आहे. मुंबई, पुण्यापाठोपाठ आता ग्रामीण भागातही कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. त्याचवेळी लोकांमध्ये याचे गांभीर्य अजूनही वाढताना दिसत नाही. कर्फ्यु जाहीर केलेल्या ठिकाणीही नागरिकाची रस्त्यावर गर्दी दिसत आहे. लोकांकडून सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ठाकरे सरकार पुढील आव्हान दिवसेंदिवस वाढत चालले आहे.