Breaking News

राज्यात 786 पोलिस करोनाबाधित

सात पोलिसांचा मृत्यू पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर 
मुंबई/नवी दिल्ली ः राज्यात करोना रुग्णांचा आकडा वाढत असतांनाच, पोलिस दलांत देखील करोना विषाणूचा शिरकाव झाला असून आतापर्यंत 7 पोलिसांचा मृत्यू झाला असून, 786 पोलिस कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे राज्यातील पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे.
76 पोलिसांनी करोनावर मात केल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. मागील 24 तासांत राज्यात तब्बल दीडशे पोलिसांना करोनानं ग्रासलं आहे. मुंबईत करोनाबाधित पोलिसांची संख्या अडीचशेच्या घरात आहे. शेकडो पोलिसांमध्ये करोनासदृश लक्षणे दिसत असून, राज्यभरात सुमारे तीन हजार पोलिसांचे विलगीकरण करण्यात आले आहे. पोलिस करोनाबाधित होत असल्याचा फटका त्यांच्या कुटुंबीयांनाही बसत आहे. संपर्कात आल्याने पोलिस कुटुंबीयांचेही विलगीकरण करावे लागत आहे. करोनाची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे पोलिस दलात अस्सवस्थ वातावरण निर्णाण झालं आहे. मुंबईत चार पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे तर नवी मुंबई, सोलापूर आणि पुणे येथे प्रत्येकी एका पोलिसाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईसह राज्यात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना मोठ्या प्रमाणात करोनाची लागण होत असल्याने पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रात करोनाचे संकट दिवसागणिक आधिकच गडद होत आहे. करोनावर मात करण्यासाठी हॉटस्पटच्या ठिकाणी लॉकडाउन आणखी कडक करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. मात्र, नागरिकांमध्ये करोनाचं गांभीर्य दिसून येत नाही. लोक विनाकाराण घराच्या बाहेर पडत आहे. बाजारात गर्दी करत आहे. सुरक्षित वावरचा विसर असे प्रकार सर्वच ठिकाणी घडत आहेत. नियम मोडणार्‍यांवर कारवाईचे काम मात्र पोलिसांना करावे लागत आहे. नियम मोडणार्‍यांची चौकशी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, कागदपत्रे बनविणे अशी कामे करताना पोलिसांचा त्यांच्याशी थेट संपर्क येतो, त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
दरम्यान, देशभरातील विविध रुग्णालयात सध्या 41 हजार 472 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. गेल्या 24 तासात देशभरात 127 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. आतापर्यंत देशभरात 2 हजार 109 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. गेल्या 24 तासात 1 हजार 511 रुग्ण कोरोनातून मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले़ देशभरात आतापर्यंत 19 हजार 358 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. देशात आता दररोज 3 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत़ त्यातील एक हजारांहून अधिक हे महाराष्ट्रातील नवीन रुग्णांचा समावेश असतो. महाराष्ट्रात आतापर्यंत 779 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. गुजरात 472, मध्य प्रदेश 215, पश्‍चिम बंगाल 171, राजस्थान 106, दिल्ली 73, उत्तर प्रदेश 74, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडु 44, तेलंगणा 30 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
देशात 24 तासात ’करोना’चे 3277 नवे रुग्ण
देशभरात करोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येतांना दिसून येत नाही. दररोज करोना रुग्णांचा आकडा वाढत असल्यामुळे चिंतेत भर वाढत चालली आहे. दररोज दोन हजारांच्या वर करोना रुग्ण आढळून येतांना दिसून येत आहे. देशभरात गेल्या 24 तासात तब्बल 3 हजार 277 नवीन करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील करोना बाधितांची संख्या आता 62 हजार 939 झाली आहे.