Breaking News

मुंबईत मान्सून11 जून रोजी होणार दाखल

मुंबई ः निसर्ग चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून उशीरा दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, 1 जूनला पाऊस केरळमध्ये दाखल झाला असून, मुंबईत तळकोकण मार्गे 11 जून रोजी मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणार्‍या कमी दाबाच्या पट्यामुळे सहा राज्यात 9 ते 11 जून दरम्यान मुसळधार पावऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, पश्‍चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यात 102 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मान्सून पूर्व सरी कोसळल्यामुळे मुंबईतील वातावरण थंड झालं आहे. आता 11 जून रोजी मुंबईत पाऊस दाखल होणार आहे. मुंबईत सोमवारी सकाळी पावसानं हजेरी लावली. मुंबईत सध्या ढगाळ वातावरण असून, अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. मोसमी वारे सध्या कर्नाटकातील कारवारपर्यंत दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये दक्षिण मध्य कर्नाटकाचा काही भाग, तमिळनाडूचा बराचसा भाग आणि मध्य पूर्व बंगालच्या उपसागरातील सर्व भागात मोसमी वारे वाहत आहेत.