Breaking News

देशात कोरोना रुग्णांचा उच्चांक ; 11,502 नवे रुग्ण

सलग पाचव्या दिवशी 300 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू 
नवी दिल्ली ः देशभरात कोरोना रुग्णांचा वेग सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनचे नियम शिथील केल्यानंतर 24 तासांत कोरोनाचे दहा हजारापेक्षाही अधिक रुग्ण आढळून येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रलयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 11 हजार 502 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 325 जणांचा मृत्यू झाला आहे. 
सलग पाचव्या दिवशी तीनशेपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. भारत आता करोनाचा फटका बसलेल्या जगभरातील देशांमध्ये चौथ्या क्रमांकावर आला आहे. सिक्कीम, लडाखसारख्या या ईशान्येकडील भागांमध्येही करोनाचा प्रदुर्भाव वाढू लागला आहे. देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या तीन लाख 32 हजार 424 इतकी झाली आहे. समाधानाची बाब म्हणजे एक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आधिक आहे. आतापर्यंत एक लाख 69 हजार 798 जणांनी करोनावर मात केली आहे. एक लाख 53 हजार 106 जणांवर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत 9 हजार 520 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात या चार राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. लॉकडाउननंतर करोना बाधित रुग्णांची संख्या वेगानं वाढायला लागली आहे. त्यात देशातील काही भागांमध्ये समूह संसर्ग झाल्याचा दावाही आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केला जात आहे. सरकारनं ही बाब स्वीकारली, तर लोक अधिक सावध होतील व काळजी घेतील, अशी सूचना वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ करत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 1,07,798 इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे पैकी 53,030 सक्रिय रुग्ण आहेत तर 50,978 रूग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात आजवर 3950 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तमिळनाडू मध्ये 44,661 एकूण रूग्णांची संख्या आहे तर दिल्लीमध्ये आजवर 41,182 रूग्णांची नोंद झाली आहे. देशात कोरोनाचा हाहाकार वाढतच चालला आहे. अशात आता अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारत हा तिसरा देश आहे जिथे दररोज दहा हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व आरोग्य मंत्री हर्षवर्धन सिंग यांनी काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन दिल्लीतील वाढत्या कोरोना रूग्णाच्या परिस्थितीचा आढावा घेतला व येत्या दोन दिवसात दिल्लीतील कोरोना चाचणीचा वेग तीन पटीने वाढवण्याची सूचना देखील करण्यात आली. आयसीएमआर या राष्ट्रीय वैद्यकीय संस्थेने केलेल्या एका अभ्यासानुसार असे सांगण्यात आले आहे की, येत्या नोव्हेंबरमध्ये कोरोना रुग्ण संख्येचे जास्त पीक दिसून येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नोव्हेंबरमध्ये पुन्हा कोरोनाची लाट
मागील 24 तासांत देशात 11,502 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली गेली. तर 325 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,69,798 इतकी आहे. तर देशात आतापर्यंत 9,520 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर येत्या नोव्हेंबरमध्ये कोरोना रुग्ण संख्येचे जास्त पीक दिसून येईल असा अंदाज आयसीएमआरने केलेल्या अभ्यासात वर्तवण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 332,424 वर पोहोचली आहे. देशात कोरोना रुग्णांचा बरा होण्याचा दर 51.07 टक्क्यांवर पोहोचला आहे.