Breaking News

‘वंदे भारत’ अभियानांतर्गत 11 हजाराहून अधिक प्रवासी राज्यात दाखल

मुंबई/पुणे ः ‘वंदे भारत’ अभियानांतर्गत 72 विमानांमधून तब्बल 11 हजार 666 प्रवासी राज्यात दाखल झाले आहेत. दाखल झालेल्या प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या 4313 आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 3729 इतकी आहे तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 3624 इतकी आहे. या सर्व प्रवाशांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे क्वारंटाईन करण्यात येत आहे.
हे प्रवासी ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकिस्तान, मॉरिशस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हिएतनाम, इटली, स्वीडन, रोम, जर्मनी, दुबई, मालदीव, वेस्ट
इंडिज आदी देशातून मुंबईत दाखल झाले आहेत. महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने परदेशातून येणार्‍या प्रवाशांसाठी दिनांक 24 मे 2020 रोजी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याअनुषंगाने आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. मुंबईतील प्रवाशांच्या संस्थात्मक क्वारंटाईनची व्यवस्था विविध हॉटेल्समध्ये करण्यात येत आहे. इतर राज्यातील व महाराष्ट्राच्या उर्वरित भागातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे. तिथे गेल्यावर त्यांना त्यांच्या जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्तांमार्फत क्वारंटाईन केले जात आहे.इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. त्यांचा वाहतूक पास संबंधित राज्यातून प्राप्त होताच या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवले जात आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने वंदे भारत अभियान महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.
दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीतील दुबई, अबुधाबी, शारजा या देशांमध्येही अनेक भारतीय नागरिक आहेत. त्यामध्ये नोकरदार, कामगार तसेच पर्यटकांचाही समावेश आहे. त्यात महाराष्ट्रीयन नागरिकांचाही समावेश होता. त्यांना परत आणण्यासाठी मागील काही दिवसांपासून मुळचे पुण्याचे असलेले दुबई येथील जीएमबीएफ ग्लोबल संस्थेचे उपाध्यक्ष राहुल तुळपुळे व शारजा येथील धनश्री वाघ पाटील यांनी प्रयत्न करत होते. त्यांनी महाराष्ट्रात येऊ इच्छिणारे नागरिक, परराष्ट्र मंत्रालय शासनाशी समन्वय साधून परतीया मार्ग मोकळा केला. शनिवारी (दि. 13) जवळपास 190 नागरिक मुंबई विमानतळावर उतरले. तर रविवारी 180 हून अधिक नागरिक विशेष विमानाने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुणे विमानतळावर उतरले. तिथे सर्वांचे थर्मल स्क्रिनींग करण्यात आले. त्यांना पुढील सात दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले जाणार आहे.


चौकट. . . .
आखाती देशांतून 180 महाराष्ट्रीयन पुण्यात
मागील अडीच महिन्यांपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकून पडलेले 180 हून अधिक महाराष्ट्रीयन बांधव मायदेशी परतले. दुबई येथून विशेष विमानाने पुणेविमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. सात दिवसांनंतर तपासणी करून त्यांना घरी पाठविले जाणार आहे. कोरोना संकटामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा ठप्प झाली. त्यामुळे जगभरातील विविध देशांमध्ये हजारो भारतीय नागरिक अडकून पडले. त्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारकडून वंदे भारत मिशन घेण्यात आले. त्यानुसार विविध देशांतून विशेष विमानाने त्यांना परत आणले जात आहे.