Breaking News

आंतरजातीय प्रेमप्रकरणातून 20 वर्षीय तरुणाची हत्या

अ‍ॅट्रोसिटीसह खूनाचा गुन्हा दाखल 
पोलिसांनी सहा जणांना घेतले ताब्यात 
पुणे ः आंतरजातीय प्रेमप्रकरणातून चार ते पाच जणांनी 20 वर्षीय तरुणाचा धारदार हत्याराने वार करून खून केला. ही घटना पिंपळे सौदागर येथे रविवारी (7 जून) रात्री ही घटना घडली. विराज विलास जगताप (वय 20, रा. तक्षशिलानगर, पिंपळे सौदागर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
प्रेमप्रकरणातून एका युवकाचा लोखंडी रॉड आणि दगडांनी जबर मारहाण करुन खून करण्यात आला आहे. मुलीचे वडील, चुलते तसेच सख्ख्या आणि चुलत भावांनी
मिळून प्रियकराचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. विराज विलास जगताप (वय 20) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जितेश वसंत जगताप (वय 44) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दहाच्या सुमारास संशयित आरोपींनी जितेश जगताप यांना फोन करुन विराजला पिंपळे सौदागर येथे मारले आहे. त्याला येथून घेऊन जा असे फोनद्वारे सांगितले. जितेश हे मृत विराजच्या आईसह घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी विराज हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. विराजने जितेश यांना सर्व हकिकत सांगितली. मुलीचे वडील, भाऊ यांनी टेम्पोने आपल्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. नंतर त्यांच्या हातातील दगड आणि लोखंडी रॉड पाहून घाबरून पळू लागल्याचे विराजने जितेश यांना सांगितले. धाप लागल्याने खाली पडल्यानंतर आरोपींनी लोखंडी रॉड आणि दगडाने आपल्याला मारहाण केली. माझ्या मुलीवर प्रेम करायची लायकी आहे का तुझी, असे म्हणून आपल्या अंगावर थुंकल्याचे विराजने जितेश यांना सांगितले. दरम्यान, जखमी विराजला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, सोमवारी दुपारी उपचारादरम्यान विराजचा मृत्यू झाला. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात खून, अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश माने हे तपास करत आहेत.