Breaking News

कोरोनामुळे देशातील 23 टक्के मृत्यू एकटया मुंबईत!

नवी दिल्ली/मुंबई : कोरोनाचा प्रादूर्भाव वेगाने वाढत चालला असून मृत रुग्णांची संख्या देखील वेगाने वाढत चालली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणार्‍या संख्येत देशाच्या तुलनेत 23 टक्के प्रमाण हे केवळ एकटया मुंबईत आढळून आले आहे. 12 जूनपर्यंत मुंबईत 2 हजार 42 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 77 टक्के म्हणजेच 1 हजार 588 लोक 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे होते. त्याचप्रमाणे न्यूयॉर्कमधील 24 हजार 495 मृतांपैकी 23 हजार 216 लोक हे 50 वर्षांवरील रुग्ण होते. ही टक्केवारी 95 पर्यंत आहे.
आतापर्यंत एकट्या मुंबईत (बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र) कोरोनाचे 56 हजार 831 रुग्ण नोंदले गेले आहेत. तर, महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 1 लाखांच्या पुढे गेली आहे. राज्यातील मृतांचा आकडा 3 हजार 830 वर पोहचला आहे. यातील 55 टक्के म्हणजेच 2 हजार 113 जणांचा मृत्यू हे फक्त मुंबईत झाले आहेत. देशात संक्रमित होणार्‍यांची एकूण संख्या 3 लाख 21 हजार 626 वर गेली आहे. त्यापैकी 17 टक्के रुग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. इतकेच नव्हे जितके रुग्ण आणि मृत्यू मुंबईमध्ये झाले तितके रुग्ण आणि मृत्यू हे देशातील 30 राज्यातही झालेले नाहीत. आतापर्यंत देशात एकूण 9 हजार 195 जणांनी कोरोनाच्या प्रादुभावाने जीव गमावला. ज्यातील 23 टक्के मृत्यू हे एकट्या मुंबईत झाले आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या बाबतीत मुंबई ही अमेरिकेतील न्यूयॉर्क मार्गावर जात आहे की नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे.  न्यूयॉर्कमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 83 हजाराच्या वर पोहचली असून 30 हजार 790 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कोरोनामुळे होणा-या मृत्यूंपैकी 22 टक्के मृत्यू न्यूयॉर्कमध्ये झाले आहेत. अमेरिकेतील मृतांची संख्या 1 लाख 17 हजार 527 पर्यंत पोहचली आहे. मुंबई हे फक्त देशच नाही तर जगातील सर्वात दाट लोकवस्तीचे शहर आहे. येथे लोकसंख्या 600 चौरस किमी मध्ये सुमारे 2 कोटी आहे. प्रत्येक एक किमीच्या परिघात 33 हजार हून अधिक लोक राहतात. तथापि, न्यूयॉर्कची लोकसंख्या फक्त 85 लाख आहे आणि प्रत्येक किमीच्या परिघात 10 हजाराहून अधिक लोक राहतात. न्यूयॉर्कमध्ये कोरोनाच्या नवे रुग्ण सापडणे कमी झाले आहे, परंतु मुंबईत नव्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. एक वेळ अशी होती जेव्हा न्यूयॉर्कमध्ये दररोज 8 हजार ते 11 हजार नवीन रुग्ण आढळून येत होते. 17 मे पासून मुंबईत रोज एक हजाराहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद केली जात आहे.

कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 26 दिवसांवर
कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण मुंबईत आता 26 दिवसांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भायखळा, धारावी, सायन-वडाळा आणि गोवंडी-मानखुर्द या विभागांमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. गोवंडी-मानखुर्दमध्ये तर 52 दिवसांनी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट होत असल्याचे समोर आले आहे. मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण 20 दिवसांवर आणण्यासाठी राज्य सरकारने आठ सनदी अधिकार्‍यांची नियुक्ती केली. तसेच गेल्या महिन्यात पालिका प्रशासनाने ‘चेसिंग द व्हायरस’ ही मोहीम सुरू केली आहे.