Breaking News

देशभरात 24 तासांत 9 हजार 987 नवे रुग्ण

331 कोरोनाबाधितांचा मृत्यू
नवी दिल्ली/मुंबई ः देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतांना दिसून येत आहे.  गेल्या 24 तासांत देशभरात 9 हजार 987 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 331 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 2 लाख 66 हजार 598 वर पोहोचली आहे. ज्यामध्ये 1 लाख 29 हजार 215 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 7 हजार 466 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आज कोरोनामुळे 109 जणांचे बळी गेले आहेत. तसेच एका दिवसात 2 हजार 553 कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा 3 हजार 169 वर पोहोचला असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 88 हजार 528 झाला आहे. तसेच एका दिवसात 1 हजार 661 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत राज्यात एकूण 40 हजार 975 बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 64 हजार 736 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 75 हजार 759 खाटा उपलब्ध असून सध्या 26 हजार 760 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत ‘कोरोना’बाधितांची संख्या 50 हजार पार
लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात आता अनलॉकचा तिसरा टप्पा सोमवारी सुरु झाला असून त्यात खासगी कार्यालयांना 10 टक्के कर्मचारी वर्गासह परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असतानाच मुंबईतील एकूण कोरोना बाधितांची संख्या सोमवारी रात्री 50 हजारांहून अधिक झाली आहे. त्यामुळे अनलॉकमध्ये मुंबईतील रस्त्यावरील गर्दी वाढून कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा हाताबाहेर तर जाणार नाही ना, अशी चिंता व्यक्त होऊ लागली आहे. सध्या मुंबईत एकूण 50 हजार 85 कोरोना बाधित आढळून आले आहेत.