Breaking News

भावंडांमध्ये मतभेद असतात, हे तर 3 पक्षाचे सरकार !

रायगड ः राज्यातील निर्णय प्रक्रियेत काँगे्रसला दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोप केल्यानंतर, घरातील तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचे तर तीन पक्षाचे सरकार आहे, असे सूचक उत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे. 
काँग्रेसच्या मंत्र्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला जात नाही, निर्णय प्रक्रियेत घेत नाही, यावरुन काँग्रेसमध्ये नाराजी आहे. थोरात सध्या कोकण दौर्‍यावर आहेत. अलिबाग येथे नुकसानग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. ’मी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. सोमवारी आम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ. पक्षांमध्ये मतभेद असतात आणि प्रत्येकाला तसा अधिकारही आहे. मात्र मुख्यमंत्र्यांशी बोलून या सर्व गोष्टी आम्ही सोडवणार आहोत’असेही त्यांनी स्पष्ट केले. निसर्ग चक्रीवादळात कोकणातील बागायती शेतीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकर्यांना आपण पूर्वीच्या निकषांच्या तुलनेत दुपटीहून अधिक मदत देऊ केली आहे. परंतु ही मदत तोकडी असल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींनी माझ्या निदर्शनास आणून दिले. यावर निश्‍चितपणे विचार केला जाईल, असे थोरात यांनी सांगितले. राज्य सरकारने हेक्टरी 50 हजार आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र कोकणातील परिस्थितीचा विचार करता ती गुंठ्याच्या हिशेबाने कशी देता येईल, याबाबत सोमवारी कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा करणार आहे. त्यामुळे मदतीपासून कोणीच वंचित राहणार नाही, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. नुकसानग्रस्त जनतेला दिलासा देण्याचे काम शासनाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही करीत आहोत. शेतकर्‍यांनी धीर धरावा, विहित नियमांपेक्षा भरीव मदत शेतकरी बांधवांना कशी देता येईल यासाठी शासन कटिबद्ध आहे. देण्यात येणार्‍या नुकसानीच्या मदतीचे निकष बदलून दुपटीहून अधिक करण्यात आले आहेत. पूर्ण घराचे नुकसान झाले असेल तर दीड लाख रुपये आणि अंशत: झाले असेल तर पंधरा हजारांच्या आसपास मदत देण्यात येणार आहे. बागायतदारांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करण्यात येणार आहे, असे थोरात यांनी सांगितले. दरम्यान, नागाव ग्रामपंचायतीमधील काही नुकसानग्रस्त नागरिकांना बाळासाहेब थोरात, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटपही करण्यात आले. नागांवनंतर थोरात चौल, मुरुड तालुक्यातील काशिद येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर मुरुड येथे अधिकार्‍यांसमवेत चर्चा करून श्रीवर्धनमधील दिघी बंदर, म्हसळ्यातील तुरुंबडी येथे नुकसानग्रस्त भागाला भेट दिली.