Breaking News

महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवला

- राज्य सरकारची अधिसूचना जारी

मुंबई / प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा धोका कायम असल्याने राज्यात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आला. ‘मिशन बिगीन अगेन‘ अंतर्गत टप्याटप्याने शिथीलता दिली जाणार आहे.
ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्णांच्या संख्येत वाढ होईल, त्या ठिकाणी संबंधित जिल्हाधिकारी किंवा पालिका आयुक्त अनावश्यक सेवांवर ठराविक भागात निर्बंध घालू शकतात, असेही यात नमूद करण्यात आले आहे. मुंबईसह एमएमआर परिसरात पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगांव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर महापालिका परिसरात अधिक निर्बंध असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एमएमआर परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना, तसेच कार्यालयात जाणार्‍यांना दूरचा प्रवास करता येणार आहे. खरेदीसाठी जवळच्या मार्केटपर्यंत जाता येईल, दूर जाता येणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (28 जून) महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सध्याचा लॉकडाऊन 30 जूननंतर उठणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच हा लॉकडाऊन आहे तसा न राहता टप्प्याटप्प्याने यात काही सवलती दिल्या जातील, असेही नमूद केले.  त्यानुसार या लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती देण्यात आल्या आहेत.
----
‘या’ गोष्टींना परवानगी
* सायकलिंग, धावणे, चालणे अशा व्यायामांना परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 5 ते संध्याकाळी 7 या वेळेत खाजगी किंवा सार्वजनिक मैदाने, समुद्र किनारे, बाग इत्यादी ठिकाणी व्यायामाला मुभा असणार आहे.
* केवळ इनडोर स्टेडियममध्ये परवानगी नाही.
* सामूहिक (ग्रुप) अ‍ॅक्टिविटीजना परवानगी नाही.
* लहान मुलांसोबत पालकांना थांबणे अनिवार्य असणार आहे.
* केवळ जवळच्या ठिकाणी व्यायाम करण्यास जाण्याची सूचना, मोकळ्या जागेतील गर्दीची ठिकाणे टाळावी.
* प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे, गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत.