Breaking News

पुणे शहरातील 70 टक्के रुग्ण कोरोनामुक्त

पुणे ः राज्यात आणि देशात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असतानाच पुणेकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी हाती आली आहे. पुण्यात आतापर्यंत सापडलेल्या कोरोना केसेस पैकी 70 टक्के केसेस निकाली निघाल्या असून आता फक्त 30 टक्के कोरोना केस शिल्लक राहिल्या आहेत. शहरातील 65.2 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे तर 4.7 टक्के रुग्णांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. पुणे शहरात आज (शनिवारी) 254 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 9 हजार 336 वर पोहचली आहे. शहरात आज 163 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत शहरातील कोरोनावर मात करणार्‍या रुग्णांची संख्या 6 हजार 87 झाली आहे. आज 14 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा 439 झाला आहे. पुण्यातील कोरोनाचा मृत्यूदर 4.7 पर्यंत खाली आहे. आता शहरात 2810 कोरोना रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची टक्केवारी 30.1 पर्यंत खाली आली आहे. पुण्यात दिवसभरात नवे 254 कोरोना रुग्ण आढळले असून यात नायडू-महापालिका रुग्णालये 179, खासगी 68 आणि ससूनमधील सात रुग्णांचा समावेश आहे. आजच्या रुग्णांसह पुणे शहरातील एकूण संख्या 9 हजार 336 इतकी झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात 2 हजार 476 स्वॅब टेस्ट नोंदवल्या गेल्या आहेत. आजवरची ही एका दिवसातील सर्वाधिक आकडेवारीपैकी आहे. पुणे शहराची एकूण स्वॅब टेस्ट संख्या आता 71 हजार 212 इतकी झाली आहे. झालेल्या स्वॅब टेस्टपैकी 13.11 टक्के चाचण्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. पुणे शहरात उपचार घेणार्‍या 2 हजार 810 रुग्णांपैकी 208 रुग्ण गंभीर असून यातील 47 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 161 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.,शहरातील कोरोनामुक्तांच्या संख्येने आज सहा हजारांचा टप्पा ओलांडला. शहरातील 163 कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून यात नायडू रुग्णालय व महापालिका रुग्णालयांतील 103, खासगी रुग्णालयांतील 50 आणि ससून रुग्णालयातील 10 रुग्णांचा समावेश आहे. या कामगिरीबद्दल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपचार करणार्‍या सर्व डॉक्टर्स व टीमला मनःपूर्वक धन्यवाद दिले आहेत.