Breaking News

नोव्हेंबरपर्यंत 80 कोटी भारतीयांना मोफत रेशन

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

नवी दिल्ली/वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा देशाला संबोधित केले. 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य देणारी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना नोव्हेंबरपर्यंत लागू राहील, पुढील 5 महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ आणि 1 किलोहरभरा डाळ मोफत देणार, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. तसेच त्यांनी शेतकरी आणि कर भरणार्‍यांचेही आभार मानले. देशात कोरोनाच्या काळात अनलॉक-1 नंतर बेजबाबदारपणा वाढल्याची खंतही मोदींनी व्यक्त केली.
देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की लॉकडाऊनदरम्यान केंद्र सरकारची देशातील प्रत्येक घरात चूल पेटली पाहिजे, ही सर्वात पहिली प्राथमिकता होती. एकाही नागरिकाने भुकेल्या पोटी झोपू नये, यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली. कोरोनाच्याविरोधात लढता लढता आपण आता अनलॉक-2 मध्ये प्रवेश करत आहोत. सोबतच सर्दी, ताप येतात अशा वातावरणातदेखील प्रवेश करत आहोत. देशाच्या नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी आपली काळजी घ्यावी. इतर देशांच्या तुलनेत भारतात परिस्थिती नियंत्रणात आहे. वेळेत लॉकडाऊन झाल्याने लाखो लोकांचे प्राण वाचले आहेत. पण देशात अनलॉक-1 नंतर लोकं आता दुर्लक्ष करत आहेत. आज अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. पण बेजबाबदारपणा वाढला आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये विशेष काळजी घ्यावी लागेल. जे लोकं नियमांचे पालन करत नाही अशा लोकांना टोकावे लागेल. एका देशाच्या पंतप्रधानांवर 13 हजाराचा दंड लागला. कारण त्यांनी मास्क लावला नव्हता. स्थानिक प्रशासनानेदेखील असेच काम केले पाहिजे. भारतात गावाचा प्रधान असो की देशाचा पंतप्रधान, कोणीही नियमाच्या वर नाही. तुमची काळजी होती म्हणून जनधन खात्यात पैसे जमा करण्यात आले. शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा झाले. गावांमध्ये श्रमिकांना रोजगार देण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्यान अभियान सुरु झाले आहे. पण एक मोठी गोष्ट अशी आहे ज्यामुळे जग देखील हैराण आहे. ती म्हणजे, कोरोनासोबत लढताना 80 कोटीपेक्षा अधिक लोकांना रेशन आपण मोफत दिले आहे, असेही मोदी म्हणाले.

सणासुदीत गोडधोड खा!
जुलैपासून सणांचे वातावरण सुरु होते. त्यामुळे खर्च देखील वाढतो. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा विस्तार दिवाळी आणि छटपुजेपर्यंत म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत केली जाईल. नोंव्हेंबर पर्यंत मोफत रेशन दिले जाईल. 80 कोटीहून अधिक लोकांना 5 किलो गहू किंवा तांदूळ मोफत दिले जाईल. सोबतच एक किलो हरभरा डाळदेखील दिली जाईल. 90 हजार कोटींचा खर्च याला येणार आहे. मागील 3 महिने पकडून दीड लाख कोटीवर हा खर्च जातो, असेही मोदी म्हणाले.


मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  •  वेळीच लॉकडाऊन केल्यामुळे देशातील परिस्थिती स्थिर
  •  अनलॉकमध्ये वैयक्तिक व सामाजिक परिस्थितीत दुर्लक्ष केले जात आहे. ही चिंतेची बाब आहे.
  •  लॉकडाऊनदरम्यान गांभीर्याने नियमांचे पालन करण्यात आले होते. मात्र आता देशातील नागरिक, संस्था पुन्हा तशाच स्वरुपातील सतर्कता दाखविण्याची गरज आहे.
  •  कंटेन्टमेंट झोनमध्ये अधिक काळजी घ्यायला हवी.
  •  गेल्या तीन महिन्यात गरिबांच्या 20 कोटी जनधन खात्यांवर 31 हजार कोटी रुपये जमा केले गेले.
  •  प्रधानमंत्री अन्नसुरक्षा योजनेचा विस्तार नोव्हेंबरअखेरपर्यंत करण्याचा विचार आहे. दिवाळी, छठपूजा होईपर्यंत मोफत धान्य मिळेल. दर महिन्याला प्रत्येक गरीब कुटुंबातल्या सदस्यांना प्रत्येकी पाच किलो गहू किंवा पाच किलो तांदूळ मिळेल.