Breaking News

अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी लोकल रेल्वे सुरु

मुंबई ः सुमारे अडीच महिन्यांनंतर मुंबईत पुन्हा एकदा लोकल सेवेची सुरुवात झाली. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकल बंद करण्यात आली होती. लोकल सुरु झाली असली तरी यातून केवळ अत्याश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनाच प्रवास करता येणार आहे. लोकलमध्ये प्रवास करणार्‍यांकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. सोमवारी पहाटे साडे पाच वाजता चर्चगेटहून विरारसाठी पहिली लोकल रवाना झाली. मध्य, पश्‍चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावर रेल्वे सुरू झाली आहे.
या माध्यमातून सुमारे 1. 25 लाख कर्मचारी प्रवास करतील. लोकल रेल्वेची सुरुवात झाल्यानंतर स्टेशनवरील सर्व बुकिंग ऑफिस सुरु करण्यात आले आहेत. त्याचबरोबर फिजिकल डिस्टन्सिंगसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 12 डब्ब्यांच्या 72 लोकल रेल्वे चर्चगेट आणि डहाणू रोडदरम्यान (अप आणि डाऊन) ठरवलेल्या प्रोटोकॉल आणि स्टँडर्ड ऑपरेटिंगनुसार धावणार आहेत. यातील 8 रेल्वे विरार ते डहाणूदरम्यान धावतील. या रेल्वे पहाटे 5.30 पासून ते रात्री 11.30 पर्यंत 15-15 मिनिटांच्या अंतराने चालतील. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना परवानगी असेल. तर, मध्य रेल्वेच्या 200 रेल्वे (100 अप+100 डाऊन) जलद असतील. ज्या सीएसटीएम ते कसारा, कर्जत, कल्याण, ठाणे आणि सीएसटीएम ते पनवेल जातील. दोन्ही लाईन्सवर तिकीट घेताना सरकारी ओळखपत्र दाखवावे लागतील. ज्यांच्याकडे सीझन तिकीट होते. त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओळखपत्र दाखवून त्यांना प्रवेश दिला जाईल. शेवटची लोकल रात्री 11.30 वाजता सुटणार आहे. अप आणि डाउन दिशेला दर 15 ते 20 मिनिटांनी लोकल धावणार आहे. पश्‍चिम रेल्वेच्या लोकल चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली या स्थानकांवर व त्यानंतर दहिसर ते विरार दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील.