Breaking News

बेजबाबदार वागल्यास जगण्यावरील निर्बंध वाढणार

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउन शिथील केला जात असून राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील केले आहेत .करोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीत केंद्र सरकारने एकापाठोपाठ एक असे चार लॉकडाउन जाहीर केल्यानंतर, पाचवे अनलॉक 1 असे नामकरण करून आणण्यात आले. महाराष्ट्र सरकारनेही मपुन:श्‍च हरिओमम म्हटले; परंतु एकूणच आपण सामाजिक शहाणपण गमावले असल्याचे समाजाने वेळोवेळी दाखवून दिले आहे. टाळेबंदी शिथिल केल्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी सोशल डिस्टंसिंगचे सर्व कायदे पायदळी तुडवल्याचे जागोजागी पाहायला मिळाले. अनेक रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली होती. तर बसेसमध्ये निर्धारित प्रवशांपेक्षा कितीतरी जास्त गर्दी झाली होती. या पार्श्‍वभूमीवर जून आणि जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात करोनाचा फैलाव होण्याची भीती आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसंच करोनाला अटकाव करण्यासाठी करोनाच्या चाचण्यांची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढविण्याची गरज तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. मुंबईत करोनाच्या रुग्णांची संख्या आता 50 हजार पार झाली असून जून अखेरीस मुंबईत एक लाखाहून अधिक रुग्ण झालेले असतील, अशी भीती या डॉक्टरांकडून वक्त होत आहे. दुर्देवाने समाजातील उच्चभ्रू वर्गही वास्तवाची जाणीव बाळगायला तयार नाही हे मरिन ड्राइव्ह येथे रस्त्यावर व्यायामासाठी बाहेर आलेल्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली त्यावरून स्पष्ट होते, मुंबई, ठाणे व पुणे येथे टाळेबंदी शिथील केल्याच्या पहिल्या दिवशी जे चित्र पाहायला मिळाले ते लक्षात घेता करोना रुग्णांच्या संख्येत आगामी काळात मोठी वाढ होईल हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही,. याशिवाय काही दिवसांपूर्वी मुंबई-पुण्यातून मोठ्या संख्येने मजुर व कष्टकरी वर्ग आपापल्या जिल्ह्यातील गावी परत गेल्यामुळे अनेक जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे लॉकडाउनच्या काळात भाजी मंडईत केली जाणारी अलोट गर्दी असो, थोडी सूट मिळाल्यानंतर रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी असो किंवा शिथिलतेच्या काळात मरिन ड्राइव्हवर फिरायला बाहेर पडलेल्या लोकांची गर्दी, ही सारी विवेकापासून फारकत घेतलेल्या समाजाचीच प्रातिनिधिक चित्रे आहेत. करोनासारख्या जगाला हादरवून टाकणार्‍या मोठ्या संकटाने अर्थव्यवस्थेसह मानवी अस्तित्वासमोर आव्हान उभे केले आहे. त्याच्यासमोर सगळेच संभ्रमित झाले आहेत. त्याचा मुकाबला करण्यासंदर्भात केंद्र-राज्यातील राज्यकर्तेही गोंधळलेले आहेत. लॉकडाउन हा करोनावरील उपाय नव्हे, हे समजण्यासाठी दोन महिन्यांचा काळ जावा लागला. त्यानंतर त्यातून बाहेर पडण्याची पावले उचलण्यास सुरुवात झाली. सरकारकडून अशी पावले उचलली जात असताना, लोकांनीही शहाणपणाचे दर्शन घडवले असते, तर संकटाचे आकलन करून घेतले आहे असे म्हणता आले असते; परंतु स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांतील फरक न समजल्याप्रमाणे लोक लगेच ताळतंत्र सोडून वागायला लागतात. रविवारी सकाळी मुंबईच्या मरिन ड्राइव्हवर फिरायला बाहेर पडलेल्या लोकांची गर्दी एकूणच समाजाची आणि सरकारचीही चिंता वाढवणारी आहे.
व्यवहार पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सरकारकडून होत असताना, शहरी भागात ठिकठिकाणी वाढणार्‍या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान दिसू लागले आहे. सोमवारपासून खासगी कार्यालये सुरू करण्यास मुभा देण्यात आल्यामुळे, शारीरिक अंतर ठेवून सुरक्षित वावराच्या नियमांची ढालच करोनाचा फैलाव रोखू शकणार आहे. त्या दृष्टीने प्रत्येक घटकाने सावध राहण्याची गरज आहे. लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार राज्य सरकार आणि महापालिकांनी नवी नियमावली तयार केली. त्यानुसार अनेक दुकाने, भाजी मंडई आणि इतर व्यवसाय सुरू झाले आहेत. नागरिकांना उद्यानांमध्ये फिरण्यास परवानगी देण्यात आली आहे. विविध कार्यालये आणि व्यावसायिकांनी कोणती खबरदारी घ्यायची, याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वाढत्या गर्दीमुळे करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होणार नाही, याची काळजी सर्वांनाच घ्यावी लागणार आहे; परंतु करोनाचा प्रसार रोखण्याची जबाबदारी सरकारची आणि आरोग्य यंत्रणेची आहे, असा लोकांचा गैरसमज असल्याचे दिसून येते. त्यातूनच असे बेजबाबदार वर्तन होताना दिसते. लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात मूठभर उपद्रवी लोकांमुळे संकटाचे गांभीर्य वाढत असल्याचे म्हटले जात होते. त्यावेळी संबंधितांना नावे ठेवणारी मंडळी आता खुलेआम नियमभंग करताना दिसत आहेत. आरोग्य नीट राखण्यासाठी मोकळ्या हवेत फिरण्याची आवश्यकता असली, तरी ते स्वतःसह इतरांना धोका निर्माण करू शकते, याची जाणीवही ठेवायला हवी. विशिष्ट शारीरिक अंतर ठेवून फिरण्याची काळजी प्रत्येकाने घेण्याची आवश्यकता आहे. मुंबईतल्या मरिन ड्राइव्हवर किंवा पुण्याच्या भाजी मंडईत हे भान ठेवले जाताना दिसत नाही. दीर्घकाळच्या लॉकडाउनमुळे घरात लोकांची घुसमट होते याचा विचार करून सरकारने काही सवलती दिल्या आहेत. याचा अर्थ अडीच महिन्यांपूर्वीच्या परिस्थितीत सुधारणा झाली आहे, असा होत नाही. उलट परिस्थिती अधिक बिघडली आहे.
मुंबई आणि उपनगरात लॉकडाउन जाहीर झाले, त्यावेळी करोनाचे अवघे 43 रुग्ण होते. आज अडीच महिन्यांनी मुंबईतल्या एकूण रुग्णांचा आकडा पन्नास हजारांच्या घरात पोहोचला आहे. हे वास्तव समजून न घेता आपण व्यवहार करणार असू, तर आपल्यासाठी कोणतीही यंत्रणा पुरी पडू शकणार नाही. करोनावर लस उपलब्ध होण्यासाठी एक वर्ष लागेल, की दोन वर्षे लागतील याबाबत तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाउनच्या पलीकडे जाऊन, करोनासह जगण्याची सवय करावी लागणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मास्क, स्वच्छता आणि शारीरिक अंतर या त्रिसूत्रीच्या आधारे पुढील वाटचाल करावी लागणार आहे. या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या असल्या, तरी यातील सुरक्षित वावराकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. नियमांना हरताळ आपणच फासायचा, परिस्थिती गंभीर बनण्यास आपणच हातभार लावायचा आणि सगळी जबाबदारी सरकारवर ढकलून नामानिराळे राहायचे, ही मानसिकता सोडून वर्तनव्यवहारात गांभीर्य आणावे लागेल. जबाबदार नागरिकत्वाच्या गप्पा सोशल मीडियावर मारण्याऐवजी प्रत्यक्ष व्यवहारातील वर्तनातून ते दाखवण्याची आवश्यकता आहे. हे दुसर्‍या कुणासाठी नव्हे तर स्वतःसाठी. नियमांमध्ये शिथिलता सरकारने दिली आहे करोनाने नव्हे, एवढे भान ठेवले, तरी पुढचा काळ सुसह्य होऊ शकेल. समाजातील काही मूठभर घटक सतत नियमभंग करून समाजकंटकाच्या वर्गात गणले जातात. या घटकांपासून आपण वेगळे असल्याचे दाखवण्याची ही वेळ आहे. त्यात प्रत्येकाचा स्वार्थदेखील दडला आहे, हे लक्षात घ्यावयास हवे. स्वतःही करोनाच्या प्रादुर्भावापासून दूर राहून, आपल्यापासून इतरांनाही धोका होणार नाही, याची काळजी घ्यायला पाहिजे. मर्यादित शिथिलतेच्या काळात ही सवय अंगी बाणवली, तर भविष्यात सर्व व्यवहार सुरळीत होतील तेव्हा त्यांचा उपयोग होऊ शकेल आणि आपलेच जगणे रुळावर येईल. जबाबदारीने वागून भविष्यात आपणच आपले जगणे रुळावर आणायचे, की बेजबाबदार वागून जगण्यावरील निर्बंध वाढवून घ्यायचे, हे ठरवण्याची ही वेळ आहे.