Breaking News

श्रीगोंदा तालुक्यात कृषी केंद्र तपासणीचा फार्स?

- केंद्राची तपासणी करण्याच्या अगोदरच होतात चालक गायब 

श्रीगोंदा/ किशोर थिटे
कृषी विभागाच्यावतीने कृषी केंद्रांच्या तपासण्या सुरु आहेत; पण या तपासण्या फक्त फार्स ठरत आहेत. ज्या कृषी केंद्राची तपासणी करायची आहे त्या केंद्राच्या चालकाला अगोदरच माहिती मिळत असल्यामुळे कृषी केंद्र चालक सावध झाले आहेत .
राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी औरंगाबाद येथे एका कृषी सेवा केंद्राच्या दुकानावर धाड टाकून युरिया खताची मागणी केली होती; पण खताचा साठा उपलब्ध असतानादेखील राज्याच्या कृषी मंत्र्यांनाच खते मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेनंतर राज्याचा कृषी विभाग खडबडून जागा झाला. या पार्श्‍वभूमीवर  श्रीगोंदा तालुक्याच्या कृषी विभागाने तालुक्यातील कृषी केंद्र तपासणी मोहीम हाती घेतली आहे. मंडल अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्या पथकाने तपासणी करून खताचा  उपलब्ध साठा व खताच्या किमती या फलकावर लावणे गरजेचे आहे; पण आजही तालुक्यातील बहुतांश केंद्रात अश्या प्रकारचे फलक लावलेले नाहीत असे दिसून येते. तालुकाकृषी  विभागाच्या दप्तरी  सर्व काही आलबेल असल्याचे दिसते. त्यामुळे कृषी विभाग नेमका शेतकर्‍यांच्या बाजूने आहे की कृषी केंद्राच्या चालकाच्या बाजूने असा सवाल उपस्थित होत आहे.

कृषी विभागाचे काही साटेलोटे आहे का ?श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे गेल्या  चार दिवसापूर्वी मंडळ कृषी अधिकारी शीतल आरु व कृषी सहाय्यक देवकाते यांनी तपासणी करण्याच्या फार्स केला. फक्त एकच केंद्र त्यांना उघडले सापडले इतर दुकाने बंद आढळून आली. पण जे बंद होते त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे? याचाही शोध घेणे गरजेचे आहे. त्यामुळे कृषी विभागाचे व कृषी केंद्र चालकांचे काही साटेलोटे तर नाही ना, असा सवाल उपस्तित होत आहे.