Breaking News

राज्यात बँक कर्मचार्‍यांना कोरोनाचा विळखा !

मुंबई : राज्यातील पोलिस दलातील कर्मचारी मोठया प्रमाणात कोरोनाबाधित होत असतांनाच आता बँक कर्मचार्‍यांना मोठया प्रमाणात कोरोनाची लागण होतांना दिसून येत आहे. आतापर्यंत 2100 बँक कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली असून 12 बँक कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी उपाययोजना करण्यासाठी बँकेच्या शिखर बँकेने राज्य सरकारला साकडे घातले आहे. 
राज्यातील सर्व बँक कर्मचार्‍यांची शिखर संघटना
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनसच्या वतीने केंद्र सरकारच्या वितीय सेवा विभागाच्या सचिवांना बँकिंग कर्मचार्‍यांच्या सुरक्षेबाबत पत्र देण्यात आले आहे. मुंबई महानगरातील करोना संसर्ग लक्षात घेता त्वरित हस्तक्षेप करून बँकांच्या सर्व शाखा दररोज सॅनेटाइज केल्या जाव्यात, प्रत्येक शाखेत गर्दीचे नियोजन करण्यासाठी गार्डची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील सर्व बँकांना कोव्हीड-19 सुरक्षेबाबत राज्य स्तरीय बँकर्स समितीद्वारे सूचना देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबई महानगरातील कोरोना संसर्ग परिस्थिती लक्षात घेता त्वरित हस्तक्षेप करून राज्यस्तरीय बँकर्स समितीद्वारे सूचना देण्यात याव्यात. यात सर्व बँकांच्या सर्व शाखा रोज सॅनेटाईझ केल्या जाव्यात व प्रत्येक शाखेत गार्ड ठेवण्यात यावा जो बँकेच्या शाखेतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल.  गेल्या अडीच महिन्यात एकट्या मुंबई महानगरात करोनामुळे 12 बँक कर्मचार्‍यांनी प्राण गमावले आहेत. बँकांमधील जवळपास 2100 कर्मचार्‍यांना करोनाची लागण झाली आहे. मुंबई महानगरात काम करणारे हजारो कर्मचारी उपनगरात राहतात. कामासाठी त्यांना दक्षिण किंवा मध्य मुंबईत यावे लागते. लोकल सेवा ठप्प असल्याने बँक कर्मचार्‍यांना बेस्ट बसने जिकीरीचा प्रवास करावा लागत आहे. बँकेत अशा गर्दीतून कामासाठी जाणे कर्मचार्‍यांसाठी आणि ग्राहकांसाठी जोखमीचे आहे, असे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे निमंत्रक देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले. ते म्हणाले की आता बँकाच्या व्यवस्थापनाने 100 टक्के उपस्थितीचा आग्रह धरला आहे. मुंबईत करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. अशावेळी कामावर जाणे बंधनकारक केल्याने बँक कर्मचार्‍यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. करोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने बँक कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची मुभा देणे, एक दिवसाआड करून उपस्थिती, गरोदर महिला आणि 55 वर्षांवरील कर्मचार्‍यांना कामातून सूट देण्याची मागणी करण्यात येत आहे. सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे बँक कर्मचार्‍यांना कोव्हीड योद्धे म्हणून ग्राह्य धरून त्यांना 50 लाख रुपयांचा विमा सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, प्रधान सचिव, राज्य स्तरीय बँकर्स समिती यांच्याकडे या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. मुंबई महानगर प्रदेशात राहणार्‍या बँक कर्मचार्‍यांना मुंबईतील बँक शाखांमध्ये पोहचण्यासाठी स्वतंत्र वाहतूक सेवा दिली तर बँक कर्मचार्‍यांना अविरत ग्राहक सेवा देता येणे शक्य आहे.

बँक संघटनेच्या मागण्या 
कोरोनाच्या परिस्थितीतही बँकेतर्फे शंभर टक्के उपस्थितीचा आग्रह धरल्या जात आहे. यामुळे बँक कर्मचार्‍यांत एक अस्वस्थता निर्माण झाली आहे. हे लक्षात घेता शक्य आहे तिथे बँक कर्मचार्‍यांना घरून काम, एक दिवसाआड उपस्थिती, गरोदर महिला व 55 वर्षांवरील कर्मचारी यांना कामातून सूट, 50 टक्के उपस्थिती व सरकारी कर्मचार्‍यांना उपलब्ध 50 लाख रुपयांचा विमा तसेच जाण्या येण्यासाठी वाहन व्यवस्था या सोयी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी या संघटनेकडून करण्यात आली आहे