Breaking News

ऐन आषाढीच्या तोंडावर पंढरपुरात कोरोना शिरला!

- प्रदक्षिणा मार्गावरील काही भाग सील

पंढरपूर/ विशेष प्रतिनिधी 
पंढरपूर शहर व वारकरी बांधवांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी आहे. पंढरपूर शहरात कोरोनाचा शिरकाव झाला असून, स्थानिक नागरिक कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा रुग्ण एका सहकारी बँकेत संचालक असून, 8 दिवसांपूर्वी त्याची आरोग्य तपासणी खुद्द तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी केली होती. त्यामुळे संबंधित बँकेच्या संचालक, कर्मचारी यांना ही क्वारन्टीन होण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. तसेच, स्वतः तहसीलदारदेखील क्वारंटाईन झाल्या आहेत.
ऐन आषाढी यात्रेच्या तोंडावरच पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा मार्गावर ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण आढळल्याने पंढरपूर मंदिर परिसराचा बाधित भाग सील केला गेला आहे. आषाढी एकादशी तीन दिवासावर आली असताना रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. पंढरपूर तालुक्यातील करकंब गावामध्ये एक आणि पंढरपुरात एक असे दोन रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला असला तरी बसने पंढरीच्या पालखीची वारी होणार आहे. त्यामुळे पांडुरंगाच्या चरणी संतांच्या पादुका अर्पण होण्याची अखंडित परंपरा कायम राहणार आहे. सरकारकडून प्रत्येक पालखीसाठी इन्सिडेंट कमांडर म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍याची नेमणूक करण्यात आली आहे. इन्सिडेंट कमांडर पादुका प्रस्थान केल्यापासून प्रस्थानच्या ठिकाणी पुन्हा येईपर्यंत पालखीसोबत राहणार आहे.बेलीचा महादेव परिसरात वास्तव्य असणार्‍या त्या व्यक्तीचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. तसेच त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. आषाढीच्या तोंडावर पंढरीत कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे.