Breaking News

नायब तहसीलदारांचेच अकाउंट हॅक


- तेढ निर्माण करणारी पोस्ट व्हायरल
- पाथर्डी तहसीलमधील धक्कादायक प्रकार

पाथर्डी /अभिजित खंडागळे
तालुक्याचे नायब तहसीलदार पंकज नेवसे यांचे फेसबुक अकाउंट हॅक करत जाणुनबुजून त्यांना बदनाम करत, पत्रकार व त्यांच्यामध्ये तेढ निर्माण होईल असा मजकूर त्यांच्या अकाउंट वरून व्हायरल करण्यात आला असून याबाबत नेवसे यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे, की नायब तहसीलदार पंकज नेवसे नेहमीप्रमाणे आपले तहसीलचे काम उकरून आपल्या घरी गेल्यानंतर त्यांच्या पुणे येथील मित्रांनी फोन करून तुमच्या फेसबुक अकाउंट वर एक वादग्रस्त पोस्ट आली असल्याची माहिती दिली. नेवसे यांनी फेसबुक अकाउंट चेक केले असता त्यावर ‘पत्रकारांनो तुमच्या लायकीमध्ये रहा, तुमच्या बापाच्या गाड्या वाळूतस्करी करतात, तेव्हा कोणत्या बिळामध्ये घुसून बसता तुम्ही, माझ्या स्वतःच्या गाड्या आहेत. मी वाळूतस्करी करतो, तर काही गुंड वडारी लोकांना सांगता तुम्ही का मला त्रास द्यावयाचा, तुम्ही पण जास्त उडू नका, सर्व धंदे बंद करेल. मी पण नायब तहसीलदार आहे. बेट्यांनो मी जर तुम्हांला त्रास दिला ना तुमचे कुत्रे हाल खाणार नाहीत. हफ्ते द्या, मग विचार करेल, मी स्वतः मॅडम पर्यत हफ्ते देतो, समजले का... दम बाजी कराल तर याद राखा.’ अशा मजकुराची एक पोस्ट आढळून आली. नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी सदरील अकाउंट हे चार पाच दिवसांपूर्वी ओपन केले होते. परंतु ते अकाउंट लॉगआऊट करण्याचे नजरचूकीने राहिले असून जाणुनबुजून मला बदनाम करत पत्रकार व माझ्यामध्ये तेढ निर्माण होईल, असा मजकूर व्हायरल केला असल्याचेत्यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. या घटनेने पाथर्डी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस अधिक तपास करत आहे.