Breaking News

येवला-कोपरगाव तपासणी नाक्याला वाहनधारक वैतागले

- वाहनांच्या लागतात रांगा; चालकांकडून लुटीची शक्यताही व्यक्त

नगर/नाशिक/ खास प्रतिनिधी

आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीच्या तपासणीसाठी निर्माण करण्यात आलेली पोलिस तपासणी केंद्रे ही लुटीची केंद्रे बनल्याचे खासगीत बोलले जात आहे. राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्याने तसेच प्रवासी वाहतुकीसाठी काही नियमांसह शिथिलता केल्याने प्रवासी वाहतूक सुरु आहे. परंतु, लॉकडाऊनचा धाक दाखवून पोलिस चारचाकी वाहनधारक व दुचाकीवाहन धारकांचा छळ करत असल्याचा प्रकार निदर्शनास येत आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ ते साडेदहा वाजेच्या सुमारास हा प्रकार दैनिक लोकमंथन पत्रकारांच्या टीमला येवला-कोपरगाव मार्गावरील पोलिस तपासणी केंद्रावर दिसून आला. पोलिसांनी तपासणीसाठी अडवून धरल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी या प्रकाराची दखल घेण्याची गरज आहे.
राज्यात अनेक जिल्ह्यात अशी परस्पर पुरक शहरे आहेत. जसे येवला व कोपरगाव हे वेगवेगळ्या जिल्ह्यात असले तरी तेथील नागरिकांना छोट्या छोट्या कारणांसाठी एकमेकांकडे यावे-जावे लागते. मनमाड - शिर्डी महामार्गावर येवल्याच्यापुढे टोलनाक्यावर येसगावजवळ असलेल्या तपासणी नाक्यावर पोलिस वाहने अडवत आहेत. कोपरगाव, शिर्डीच्या दिशेने व तिकडून येवला, मनमाडकडे जाणारी चारचाकी, दुचाकी वाहने तपासणीच्या नावाखाली तासंतास अडवून धरली जात आहेत. नागरिकांना या मार्गावर पोलिसांनी निर्माण केलेल्या तपासणी केंद्राचा नाहक जाच सहन करावा लागत आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने अनलॉक-1 राबविताना जिल्हाबंदी उठवली आहे. परंतु, राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने अद्याप ती उठवलेली नाही. परिणामी, नाशिक व नगर जिल्ह्यातून जा-ये करणार्‍या नागरिकांची मोठी गळचेपी पोलिस करत आहेत. तेव्हा ठाकरे सरकारने जिल्हाबंदी उठवून तातडीने ही तपासणी केंद्रे बंद करावीत, अशी मागणी पुढे आली आहे. येवला-कोपरगाव तपासणी नाक्यावर तर वाहनधारक त्रस्त होत असून, त्यांना दैनंदिन व्यवहारासाठीही नाशिक किंवा नगर जिल्ह्यात जाता किंवा येता येत नाही. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास तर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. तसेच, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. हे तपासणी केंद्र लुटीचे केंद्र बनल्याची बाबही काही खासगी वाहनधारकांनी खासगीत सांगितले आहे. तेव्हा वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी तातडीने या प्रकाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनधारक करत होते.