Breaking News

‘विठ्ठल’च ठरले महापुजेचे मानकरी!

पाथर्डीतील विठ्ठल बढे दाम्पत्याला शासकीय पुजेचा मान


- मुख्यमंत्री उद्धव व रश्मी ठाकरे यांच्यासमवेत करणार शासकीय पूजा
- मंदिरातील वीणा पहारेकर्‍यास पांडुरंगाने दिले सेवेचे फळ

पंढरपूर/ खास प्रतिनिधी 
विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजा मध्ये मानाचा वारकरी म्हणून यंदा श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरात वीणेकरी म्हणून सेवा बजावणारे पाथर्डी (जि. अहमदनगर) येथील विठ्ठल ज्ञानदेव बढेयांना सपत्नीक मिळाला आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून ते विठ्ठल मंदिरात वीणेकरी म्हणून पहारा देत आहेत. त्यांचे कुटुंबीय माळकरी असून, तेदेखील नियमित वारी करतात. सोमवारी झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत चिठ्ठी काढून त्यांची निवड करण्यात आली. यानिमित्ताने साक्षात पांडुरंगानेच आपल्या या भक्ताला शासकीय पूजेची संधी दिल्याची वारकरी बांधवांत चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्यासोबत त्यांना शासकीय महापूजा करण्याचा सन्मान लाभला आहे.
पंढरपुरातील आषाढी यात्रेचा कालावधी 22 जून ते 5 जुलै 2020 असा आहे. आषाढी यात्रा एकादशीनिमित्त असणारी विठ्ठल-रुख्मिणीमातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते 1 जुलै 2020 रोजी पहाटे 2 वाजून 20 मिनिटांच्या मुहुर्तावर होणार आहे. विठ्ठल नामदेव बडे हे वंजारी समाजातील वारकरी विठ्ठलभक्त असून, ते नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील रहिवासी आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षापासून ते विठ्ठल मंदिरात वीणा वाजवून पहारा देतात. गेल्या तीन महिन्यापासून लॉकडाऊन असतानादेखील त्यांनी आपली सेवा विठ्ठलचरणी अर्पण केली होती.