Breaking News

सातारा पालिकेत शिवसेनेच्या पदाधिकार्‍यास ठेकेदाराने ठोकले

सातारा/ प्रतिनिधी : सातारा नगरपालिकेच्या उपमुख्याधिकार्‍यांने 2 लाख 30 हजार रुपयाची लाच घेतल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आलेले असतानाच ठेकेदाराने शिवसेनेचा पदाधिकारी असलेले नरेंद्र पाटील यांना पालिकेच्या कार्यालयात भरदिवसा ठोकल्याच्या घटनेने सातारा नगरपालिका पुन्हा चर्चेत आली. दरम्यान, लाचखोरीच्या प्रकरणाबाबत पत्रकबाजांनी पत्रकांचा पाऊस पाडला होता. आता याप्रकरणी पत्रकबाज काय भूमिका घेणार याकडे सातारा शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सातारा नगरपालिकेत सुरु असलेले ठेकेदारांचे राज्य आणि त्यांना बिले काढताना करावा लागणारा प्रवास हा काही नवा नाही. त्यातच गेल्या आठवड्यात कचर्‍याचे टेंडर रिन्यू करण्यासाठी 2 लाख 30 हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी पालिकेचा उपमुख्याधिकारी संचित धुमाळ सह अन्य तिघेजण अडकले आहेत. अशा परिस्थितीत सोमवार, दि. 15  रोजी सकाळी पारंगे चौकातील कामावरून नरेंद्र पाटील व ठेकेदार गणेश पवार यांच्यामध्ये वादावादी झाली. यामध्ये पालिकेच्या कार्यालयातच गणेश पवार या ठेकेदाराने नरेंद्र पाटील यांना मारहाण केली. यानंतर दोन्हीकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. यादरम्यान, नरेंद्र पाटील यांनी गणेश पवार यांना काम बंद न पाडण्यासाठी 50 हजार रुपयाची मागणी केली असल्याचा आरोप केला आहे. तर नरेंद्र पाटील यांनी कामाचा दर्जा ढाळसत असल्याने पालिकेचा अधिकारी असल्याशिवाय डांबर टाकायचे नाही, असे अग्रह धरला असल्याचे म्हटले आहे.
सातारा पालिकेत झालेली लाचखोरी व त्यापाठोपाठ झालेली मारहाण या दोन प्रकरणामुळे सातारा नगरपालिका पुन्हा चर्चेत आली आहे. लाचखोरीच्या घटनेमध्ये चोर-चोर म्हणून बोंबा मारणारे पत्रकबाज आता काय करणार याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे. पालिकेचे अधिकारी चोर आहेत, असे आरोप करणारे एकत्र येवून या अधिकार्‍यांना सरळ करायचे सोडून एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत होते. आता लोकप्रतिनिधी या प्रकरणास कशाप्रकारे हाताळतात याकडेही सातारकरांचे लक्ष लागले आहे.