Breaking News

हभप. निवृत्तीमहाराज इंदुरीकरांना बडबड भोवली!

‘पीसीपीएनडीटी’नुसार कोर्टात गुन्हा दाखल 
- म्हणे, समतिथीला शरीरसंबंधानंतर मुलगा जन्माला येतो!

संगमनेर/ तालुका प्रतिनिधी
स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होतेआणि अशुभ तिथीला झाला तर संतती रंगडी व बेगडी जन्माला येते, असे वादग्रस्त वक्तव्य करणे प्रसिद्ध कीर्तनकार हभप. निवृत्ती महाराज देशमुख-इंदुरीकर यांना चांगलेच भोवले असून, त्यांच्याविरोधात शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर न्यायालयात पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समतारखेला शरीरसंबंध केला की मुलगा व विषम तारखेला शरीरसंबंध केला की मुलगी होते, असे वादग्रस्त वक्तव्य फेब्रुवारी महिन्यात हभप. इंदुरीकर महाराज यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद राज्यभर सुरु झाला होता. इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात आणि समर्थनात असे दोन गट पडले होते. अनेक संघटनांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेत आंदोलने केली होती. यामुळे इंदुरीकरांना त्यांचे कीर्तनाचे कार्यक्रमदेखील रद्द करावे लागले होते. वाद चिघळल्यानंतर या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवृत्ती महाराज इंदुरीकर दिलगिरी व्यक्त केली होती. तथापि, हभप. इंदुरीकरांच्या वादग्रस्त विधानावरून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलाम 22 चे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत अहमदनगर येथील पीसीपीएनडीटीच्या सल्लागार समिती सदस्यांनी इंदुरीकरांना नोटीस पाठवली होती. त्यावर इंदुरीकरांना वकिलांन मार्फत बाजू मांडली होती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. रंजना गावंदे यांनी कायदेशीर नोटीस देत प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास तुम्हालाही दोषी धरण्यात येईल, असे बजावले होते. तसेच, संगमनेर कोर्टात धावही घेतली होती. त्यामुळे इंदुरीकरांच्या वादग्रस्त विधानानंतर संगमनेर आरोग्य विभागाच्या पीसीपीएनडीटी कायद्याच्या समुचित प्राधिकार्‍यांनी यासंदर्भातील योग्य पुरावेजमा करून न्यायालयात खटला दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. अखेर लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर संगमनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडून तीन महिन्यांनंतर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांच्याकडून इंदुरीकर महाराजांविरोधात संगमनेर प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयात 19 जूनला हा खटला दाखल करण्यात आला. या खटल्यावर आता पहिली सुनावणी 26 जूनला झाली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हभप. इंदुरीकर काय म्हणाले होते?
स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टायमिंग हुकला की क्वॉलिटी खराब. पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्यापोटी हिराण्यक्षपू नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला.