Breaking News

कोरोनामुळे स्वालंबी होण्याची संधी : पंतप्रधान मोदी

ईशान्येकडील राज्यांना सेंद्रीय शेतीचे हब बनविण्याचा विचार 
नवी दिल्ली : देशाला आज आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे. तसेच दुसर्‍या देशांवर अवलंबून राहणे आता कमी करावे लागणार असून, स्वालंबी होण्याची हीच योग्य वेळ असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. द इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या 95 व्या वार्षिक सत्रात पंतप्रधान मोदी बोलत होते.
स्थानिक उत्पादनांसाठी क्लस्टरच्या आधारावर बळकटी देण्यात येत आहे. ईशान्येकडील राज्यांना सेंद्रिय शेतीचं हब बनवण्यावर विचार सुरू आहे. आयसीसीने ठरवल्यास याची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करता येऊ शकते. कोलकात्याने पुन्हा एकदा लीडर बनण्याची वेळ आली आहे. बंगाल जो आज विचार करतो तो संपूर्ण देश पुढे करतो असे म्हटले जात, असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, कोरोना संकटाचा हा काळ संधीत रुपांतरित करावा अशी आज प्रत्येक भारतीयांच्या मनात इच्छा आहे. या स्थितीचा आपण भारतीय अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारा क्षण म्हणून उपयोग केला पाहिजे. आपण वैद्यकीय उपकरणे बनविण्याच्या क्षेत्रात स्वावलंबी होऊ शकतो. आपण कोळसा आणि खनिज क्षेत्रात स्वयंपूर्ण होऊ या. मी आशा करतो की आपण खाद्यतेलाच्या उत्पादनात  प्रगती करू शकू. भारत खताच्या उत्पादनात देखील स्वयंपूर्ण होऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात भारत स्वावलंबी बनण्याची भारताला संधी आहे. सौर पॅनेल्स, बॅटरी आणि चिप्सच्या निर्मितीमध्ये भारताने  योगदान द्यायला हवे. विमान वाहतूक सेवा क्षेत्रातही भारत स्वयंपूर्ण व्हायला हवा. तरच आपण पुढे जाऊ. अशा किती प्रकारच्या इच्छा नेहमीच प्रत्येक भारतीयांना आव्हान देत असतात. मागील 5-6 वर्षांमध्ये भारताचे स्वावलंबन करण्याचे ध्येय राहिलेले आहे. कोरोना संकटाने हे धेय्य गाठण्याचा वेग तीव्र करण्याचा धडा शिकवलेला आहे. हा धडा स्वावलंबी भारत मोहिमेमधून पुढे आला आहे. या संकटाचे औषध मजबुती हे असल्याचे मोदी म्हणाले.  आम्ही कोरोनाविरूद्ध लढ्यात पूर्णपणे उतरलेलो आहोत आणि आम्ही त्यावर विजय मिळवू. आमचे कोरोना योद्धा लढत आहेत. या संकटाला आपण एका संधीमध्ये रुपांतरित केले पाहिजे. हे संकट आपल्या देशासाठी एक मोठा टर्निंग पॉईंट बनली आहे. आम्ही नक्कीच कोविड -19ला पराभूत करू आणि या दिशेने पुढे जात राहू, असा विश्‍वास पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

‘लोकल’साठी आता ’व्होकल’ होण्याची वेळ 
कुटुंबातील मूल, मुलगा किंवा मुलगी 18-20 वर्षांची झाली, की पालक त्यांना स्वत: च्या पायावर उभे राहण्यास सांगतात. हा एक प्रकारे स्वावलंबी भारताचा हा पहिला धडा व्यक्ती आपल्या कुटुंबातच शिकत असते. भारतालाही आपल्या पायावर उभे रहावे लागेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ’लोकल’साठी आता ’व्होकल’ बनण्याची वेळ आली आहे. प्रत्येक देश,  जिल्हा आणि राज्याला स्वावलंबी बनवण्याची ही वेळ असल्याचे पंतप्रधान म्हणाले.