Breaking News

सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले

मुंबई ः लॉकडाउनचे नियम शिथिल केल्यानंतर दररोज पेट्रोल-डिझेलची दरवाढ होतांना दिसून येत आहे. सलग पाचव्या दिवशी गुरुवारी इंधनाच्या किंमती महागल्या. रविवारपासून सुरु असणार्‍या दरवाढीमध्ये गुरूवारी पेट्रोलचे आणि डिझेलचे दर 60 पैसे प्रती लीटरने वाढवण्यात आले आहेत. बुधवारी इंधन कंपन्यांनी पेट्रोलचे दर 40 पैसे प्रती लीटर तर डिझेलचे 45 पैसे प्रती लीटरनं वाढवले होते.
रविवारी पहिल्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 60 पैसे प्रती लीटरची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 60 पैशांची वाढ झाली होती. दिल्लीतील आजचा पेट्रोलचा दर वाढून 74 रुपये प्रती लीटर आणि डिझेलचा दर 72.22 रुपये प्रती लीटर इतका झाला आहे. तर मुंबईतही पेट्रोलचा दर 81.01 रुपये प्रती लीटर, तर डिझेलचे दर 70.97 रुपये प्रती लीटर झाले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या असणार्‍या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमीटेडबरोबर हिंदुस्ताना पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडनेही 14 मार्चपासून इंधनाच्या दरांमध्ये रोज बदल करण्याचा निर्णय तात्पुरता मागे घेतला होता. मात्र, लॉकडाउनचे नियम शिथिल केल्यानंतर दररोज इंधनदरवाढ होत असतानाचं चित्र मागील आता पहायला मिळत आहे. सरकारने मार्चमध्ये प्रती लीटरमागे 3 रुपयांनी अबकारी कर वाढवल्याने तेल कंपन्यांनी दरवाढ थांबवली होती. मात्र सरकारने करवाढ केल्यानंतरही कंपन्यांनी त्याचा भार ग्राहकांच्या खिशावर पडू न देण्याचा निर्णय घेत किंमती वाढवल्या नव्हत्या. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किंमती दोन दशकांमध्ये सर्वात कमी असतानाच सरकारने 6 मे रोजी तेल कंपन्यांकडून पेट्रोलवर प्रती लीटर 10 रुपये तर डिझेलवर प्रती लीटर 13 रुपये कर आकारण्यास सुरुवात केली. मात्र आता हळूहळू कंपन्यांनी या कराचा बोजा ग्राहकांवर टाकण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.