Breaking News

कोरोना चाचणी आणखी स्वस्त!

मुंबई/प्रतिनिधी
करोनाच्या आजाराशी झुंजणार्‍या राज्यातील रुग्णांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने घेतला आहे. खासगी लॅबमध्ये होणार्‍या करोना चाचण्यांच्या दरात थेट 50 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे खासगी लॅबमध्ये चाचणीसाठी साडेचार हजारांऐवजी फक्त 2,200 रुपये मोजावे लागणार आहेत.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोविड चाचणीच्या सुधारीत दरांची यादी जाहीर केली. कोविड चाचणीचे नवे दर हे देशात सर्वाधिक कमी आहेत, असा दावा त्यांनी यावेळी केला. नव्या निर्णयानुसार, खासगी लॅबना रुग्णालयांतून घेतलेल्या स्वॅब नमुन्यांसाठी केवळ 2200 रुपये आकारता येणार आहेत. तर, रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅबचे नमुने घेतल्यास त्यासाठी 2,800 रुपये आकारता येतील. पूर्वी हेच दर अनुक्रमे 4,500 व 5,200 असे होते. खासगी लॅबसाठी नवे दर बंधनकारक असणार आहेत. जिल्हाधिकारी आपापल्या जिल्ह्यातील खासगी लॅबशी संपर्क साधून यात आणखी कपात करण्याबाबत चर्चा करू शकतात. मात्र, सरकारने ठरविलेल्या या दरापेक्षा एक पैसाही अधिक आकारता येणार नाही. तसा प्रयत्न कुणी केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा टोपे यांनी दिला आहे. सध्या राज्यात कोविडची चाचणी करणार्‍या 91 लॅब आहेत. आणखी पाच ते सहा लॅब लवकरच कार्यरत होतील. नव्या दरांमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
कोरोना चाचणीचे आधीचे दर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने ठरवून दिले होते. मात्र, यात आणखी कपात होऊ शकते का याची चाचपणी करण्याच्या सूचना आयसीएमआरने राज्याला दिल्या होत्या. त्यानुसार सरकारमान्य खासगी लॅबमधील कोविड चाचणीसाठी नवे दर ठरविण्यासाठी मागील आठवड्यात चार सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती.
चोवीस तासांच्याआत अहवाल देणे बंधनकारक
राज्यात आतापर्यंत सहा लाखाहून अधिक करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात एकूण 555 प्रयोगशाळा असून राज्यात 88 प्रयोगशाळांच्या माध्यमातून वेगाने चाचण्या केल्या जात आहेत. सुरुवातीला खासगी प्रयोगशाळांच्या चाचणीचे अहवाल मिळण्यास तीन ते सहा दिवस लागायचे मात्र आता हे अहवाल चोवीस तासाच्या आत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. देशात आज घडीला दर दहा लाख लोकांमागे 2363 करोना चाचण्या केल्या जातात तर राज्यात हेच प्रमाण दहा लाख मागे 13,000 एवढे आहे.