Breaking News

मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची ग्वाही 
अलिबाग ः निसर्ग चक्रीवादळामुळे अनेक लोक बेघर झाले असून, अनेकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्वांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून, कुणीही मदतीपासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही काँगे्रस नेते अणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी दिली. बाळासाहेब थोरात कोकणच्या दौर्‍यावर असून, यावेळी ते बोलत होते. 
सुरुवातीला त्यांनी अलिबाग तालुक्यातील नागाव आणि चौल येथील नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर ते मुरुड तालुक्याकडे रवाना झाले. तेथून ते श्रीवर्धन तालुक्यातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. रायगड जिल्ह्यात लाखो घरांची पडझड झाली आहे, तर हजारो हेक्टर बागायतींचे क्षेत्र उध्वस्त झाले आहे. विजेचे खांब, विजेच्या तारा यांचीही मोठ्या संख्येने पडझड झाल्याने आजही शेकडो गावे अंधारातच आहेत. रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकणी जनतेला तातडीने मदतीचा हात तसेच आधार देण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे एक दिवसाच्या कोकण दौर्‍यावर आले. सर्वप्रथम त्यांनी अलिबाग तालुक्यातील नागाव, चौल येथील नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी थेट नुकसानग्रस्त बागायतदार शेतकर्‍यांशी थेट संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कोकणातील नागरिकांना योग्यती मदत देण्याचे काम सरकारने युद्ध पातळीवर सुरू केले आहे. कोणीही मदतीपासूनच वंचित राहणार नाहीत याची ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. नागाव ग्रामपंचायतीमधील  नुकसानग्रस्त नागरिकांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी पालकमंत्री आदिती तटकरे, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी निधी चौधरी उपस्थित होते.