Breaking News

मान्सूनची यशस्वी आगेकूच!

- दोन दिवसात महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागात हजेरी
- यंदाचा मान्सून कृषिक्षेत्रासाठी चांगला

नवी दिल्ली/प्रतिनिधी
देशात नैऋत्य मान्सून मोठ्या वेगाने पुढे सरकत आहे. त्यामुळे आतापर्यंत मान्सूनचा पाऊस दक्षिण भारतातील अनेक राज्यांच्या किनारपट्टी भागात दिसून आला. भारतीय हवामान विभाग (आयएमडी)च्या मते, येत्या 24 तासात बंगालच्या उपसागरात कमी-दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. त्यामुळे दक्षिण-पश्‍चिम मॉन्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. हवामानात असाच बदल राहिला तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणासह देशातील बर्‍याच भागात पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर, येत्या दोन दिवसांत मॉन्सून बंगालच्या उपसागरासह, ईशान्येकडील राज्ये, सिक्कीम, ओडिशाचा काही भाग आणि गंगेच्या पश्‍चिम बंगालमध्ये पुढच्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.
स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, कर्नाटक किनारपट्टी आणि केरळनंतर गेल्या दोन दिवसांत मान्सूनने दक्षिणेकडे कर्नाटक, तामिळनाडूचा बहुतेक भाग, रायलसीमा आणि दक्षिण किनारपट्टी आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये तडाखा दिला. ईशान्य भारतात, मान्सून पुढील दोन-तीन दिवसांत चांगलाच बरसण्याची शक्यता आहे. तर कोकण, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील उर्वरित भागात पुढे जाईल. तर मिळालेल्या माहितीनुसार, जूनच्या पहिल्या आठवड्यात देशात मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा 71 टक्के जास्त झाला आहे. यात मध्य भारत आणि केरळ यांचे सर्वाधिक योगदान आहे.
---
10 ते 16 जूनदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता
अरबी समुद्रावरील दक्षिण-पश्‍चिमी वारे सक्रीय झाल्यामुळे, मान्सून कर्नाटक व रायलसीमाच्या काही भागात पडून तो पुढे तेलंगणात पोहोचेल. तसेच मुंबईसह महाराष्ट्राच्या कोकण भागात, मध्य महाराष्ट्रातही लवकरच पावसाळ्याच्या आगमनाची चांगली बातमी येईल. येत्या काही दिवसांत मान्सूनची प्रगती होत असल्याने ओडिशा, गंगा पश्‍चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रात 10 ते 16 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कृषी क्षेत्रासाठी यंदा मान्सून चांगला असल्याचं सांगण्यात येत आहे.