Breaking News

रिंगमास्टरच्या हंटरवर चालणारे मंत्री लोकशाही सरकारला ’सर्कस’ म्हणतात!

- राष्ट्रवादी काँग्रेसचे राजनाथ सिंहांना जोरदार प्रत्युत्तर 
मुंबई/ प्रतिनिधी
रिंगमास्टरच्या हंटरवर चालणार्‍या सरकारचे मंत्री लोकशाहीने चालणार्‍या सरकारला ‘सर्कस’ म्हणतात, अशा शब्दात महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या टीकेला उत्तर दिले. महाराष्ट्रात सरकार नसून सर्कस सुरु असल्याची बोचरी टीका राजनाथ सिंह यांनी केली होती. 
महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने चालणारे
सरकार चांगले काम करत आहे. कोविडबाबत मुंबई मॉडेलचे आयसीएमआरने (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद) कौतुक केले आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंहजी, रिंगमास्टरच्या हंटरवर चालणार्‍या सरकारचे मंत्री लोकशाहीने चालणार्‍या सरकारला ‘सर्कस’ असे संबोधतात. अनुभवाचे बोल अशा आशयाचे ट्वीट नवाब मलिक यांनी केले आहे. राजनाथ सिंह यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्र जनसंवाद रॅलीला संबोधित केले होते. यावेळी राजनाथ सिंह यांनी सोनू सूदचेही कौतुक केले. ‘मी टीव्हीवर पाहिले की अभिनेता सोनू सूद या संकटात अडकलेल्या कामगारांना मदत करत आहे. पण संकटात अडकलेल्या मजुरांना मदत करणार्‍या व्यक्तीवर काही जण टीका करत आहेत.’ असा निशाणा राजनाथ सिंह यांनी साधला होता.
महाराष्ट्र सरकार हे तीन पक्षांचे सरकार आहे. असे वाटते की सरकारच्या नावाखाली ‘सर्कस’ होत आहे. महाराष्ट्र शासनाकडे ज्या प्रकारची दूरदृष्टी असायला हवी, तीच दिसत नाही अशी टीकाही त्यांनी केली होती. राजनाथ सिंह यांनी शिवसेनेला युती तोडल्याबद्दल कडाडून टोला लगावला जेव्हा निवडणुका लढल्या गेल्या, तेव्हा भाजपशी शिवसेनेने युती केली. पण युतीनंतर सत्तेच्या लालसेतून भाजपला धोका दिला. मला विश्‍वास नाही बसत ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे असा घणाघात राजनाथ सिंह यांनी केला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी सांगतात, की आम्ही महाराष्ट्रात सत्तेत आहोत, पण निर्णयात नाही. म्हणजे जेव्हा संकट येते, तेव्हा हे हात झटकतात अशी टीका राजनाथ यांनी केली होती.