Breaking News

पेट्रोल, डिझेल पुन्हा भडकले

- सलग दुसर्‍या दिवशी 58 पैशांनी महागले
मुंबई/ प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे देशात काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ झालेली नव्हती. मात्र सोमवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंब
ईत सोमवारी पेट्रोल 58 पैशांनी महाग झाले. त्यामुळे मुंबईकरांना एक लिटरपेट्रोलसाठी 79.49 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 58 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 69.37 रुपयांवर गेला आहे. राज्यातही इंधनाच्या दरात वाढ झाली आहे.
दिल्लीकरांनाही इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर 60 पैशांनी तर डिझेलचे दर 60 पैशांनी वधारले आहेत. त्यामुळे सोमवारी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 72.46 रुपये आणि 70.59 रुपये मोजावे लागतील. गेल्या 80 दिवसांत पहिल्यांदा रविवारी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाली होती. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 60-60 पैशांची वाढ करण्यात आली होती.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलची मागणीत सुधारणा होत आहे. याच दरम्यान कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 40 डॉलरपेक्षा जास्त झाली आहे. लॉकडाऊन दरम्यान जवळपास गेल्या 80 दिवसांत तेल विपणन कंपन्यांनी  पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल केला नाही. 16 मार्च रोजी इंधनाच्या किंमतीत बदल झाला होता. त्यानंतर रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत प्रति लिटर 60-60 पैशांची वाढ करण्यात आली. लॉकडाऊनदरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील चढ-उतारांना राज्य सरकार जबाबदार आहेत. राज्यांचा महसूल वाढवण्यासाठी व्हॅट किंवा सेसमध्ये वाढ झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ नोंदवली आहे. मे महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये आणि डिझेलवर 13 रुपये प्रतिलिटर वाढ केली. यानंतरही दोन्ही इंधनांच्या किरकोळ किंमतीत कोणताही बदल झाला नाही. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये झालेला बदल कच्च्या तेलाच्या किंमतींच्या आधारे ठरविला जातो. कारण 80 टक्के कच्चे तेल आयात करतो.