Breaking News

कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जातेय !

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा 
नवी दिल्ली ः जगभरात लॉकडाऊनचे नियम शिथील केल्यानंतर कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असून, वेळीच उपाययोजना करण्याची गरज असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. जगभरात सोमवारी सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, जगातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होतांना दिसून येत आहे. अमेरिकेत सध्या कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूवरुन आंदोलनं सुरु असून जागतिक आरोग्य संघटनेने आंदोलनकर्त्यांना सुरक्षेची सर्व काळजी घ्या असा सल्ला दिला आहे. 
कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास 70 लाख लोकांना लागण झाली आहे. डिसेंबर महिन्यात चीनमधून कोरोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली होती. कोरोनावर अद्याप कोणतेही औषध अथवा लस अद्याप उपलब्ध झालेले नाही. जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एदनहोम गेब्रेयासिस यांनी युरोपातील परिस्थिती सुधारत आहे. मात्र जगभरात कोरोनामुळे परिस्थिती बिघडली आहे. गेल्या 10 दिवसांत कोरोनाची एक लाख प्रकरणे समोर आल्याची माहिती दिली आहे. तसेच रविवारी जवळपास 1 लाख 36 हजार लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. ही आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक आकडेवारी आहे. जी आकडेवारी आली त्यामधील 75 टक्के रुग्ण हे एकूण 10 देशांमधील होते. यामध्ये अमेरिका आणि दक्षिण आशियाची आकडेवारी सर्वाधिक आहे असल्याचे समोर आले आहे. कोरोनासंदर्भात लोकांच्या मनात अनेक प्रश्‍न आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणे नसलेल्या अनेक व्यक्तीची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. लक्षणं नसलेल्या रुग्णांकडून कोरोना व्हायरसचा प्रसार होतो का? याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने आता खुलासा केला आहे. एसिंप्टोमेटिक म्हणजेच लक्षणे नसलेल्या रुग्णांपासून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका कमी असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 71 लाखांच्या वर गेली आहे. तर तब्बल चार लाखांहून अधिक लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. वेगाने पसरणार्‍या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. अनेक देशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असून गंभीर परिस्थिती आहे. कोरोनाग्रस्तांची आणि मृतांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. याच दरम्यान चिंता वाढवणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबतच गंभीर इशारा दिला आहे.