Breaking News

लडाखच्या सीमेवर चीनच्या हेलिकॉप्टर्सच्या घिरटया !

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी घेतली तीनही दलप्रमुखांची बैठक
नवी दिल्ली ः सीमेवरील प्रश्‍न शांततेच्या मार्गाने सोडविण्याची चर्चा चीन भारतासोबत करत असतांनाच, सीमेवर चीनकडून सैन्याची जमवाजमव सुरु असल्याचे समोर आले आहे.
चीनने पुन्हा एकदा सीमेवर हालचाली वाढवल्या आहेत. पूर्व लडाखच्या आसपासच्या सीमेजवळ चीनने हेलिकॉप्टरच्या हालचाली तीव्र केल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर लडाखजवळ जमलेल्या चिनी सैनिकांना मदत करण्यासाठी
वापरण्यात येत आहेत. गेल्या 8-10 दिवसांपासून सीमेच्या दोन्ही बाजूंनी खळबळ उडाली आहे, अशा परिस्थितीत चीन सतत आपले सामर्थ्य बळकट करत असल्याचे दिसते.
लडाख प्रदेशात भारत आणि चीनमध्ये अजूनही तणाव कायम आहे. दोन्ही देशांमधला हा सीमावाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 6 जून रोजी झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. मात्र चीनकडून पेट्रोलिंग, वस्तूंच्या पुरवठ्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जात होता, परंतु आता ते सर्व भारताच्या सीमेवर उडत आहेत. या व्यतिरिक्त चायनीज आर्मी पीएलएची लढाऊ विमानंही पूर्व लडाखजवळ एलएसीवर उडत असल्याचे दिसून आले आहे. चीनच्या हुतान आणि गलगुन्सा तळांवरही भारत नजर ठेवून आहे आणि चीनच्या प्रत्येक हालचालींवर भारताचं लक्ष आहे. महत्त्वाचे म्हणजे मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. परंतु यापूर्वी चीनने कधीही लढाऊ विमान सीमेवर तैनात केली नव्हती, त्यामुळे आता परिस्थिती आणखी तीव्र बनली. आणि 2017 मध्ये डोकलामदरम्यान निर्माण झालेल्या परिस्थितीच्या हा वाद पुढे गेला आहे. पूर्वीच्या लडाखजवळील क्षेत्र हुतान-गलगुन्सा तळाजवळ 10-12 चिनी लढाऊ विमानं तैनात करण्यात आली आहेत. एवढेच नाही तर चिनी विमानं हे पूर्व लडाखच्या पूर्वेस 30 किमी अंतरावर आहेत. आता ती विमानं तिकडे उडताना दिसली आहेत, जे आंतरराष्ट्रीय नियमांनुसार भारतीय सीमेच्या दहा किमी फक्त दूर आहे. भारत आणि चीनमधील या वादावर 6 जून रोजी लेफ्टनंट जनरल लेव्हलची बैठक झाली होती, परंतु अद्याप तोडगा निघाला नाही. दोन्ही देशांमध्ये चर्चा अद्यापही सुरू आहे. दरम्यान, पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत आणि तीनही लष्करी दलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही देशातील लष्करी अधिकार्‍यांमध्ये झालेल्या चर्चेचा आढावा घेण्यात आला. चर्चेचा आढावा आणि लष्कराची मोठ्या लढ्यासाठी असणारी तयारी, त्याचे भविष्यातील नियोजन यासाठी ही बैठक आयोजित केली होती, या बैठकीत देशासमोर असणार्‍या समस्यांबाबतच्या नियोजनाचा आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले. ही बैठक सुमारे तासभर बैठक झाली. रावत यांनी भविष्यातील योजनांची माहिती दिली, असे सूत्रांनी सांगितले.

चीनवर आर्थिक सर्जिकल स्ट्राइक हवाच
भारत आणि चीनदरम्यान दिवसोंदिवस तणाव वाढत असतानाच चीनी मालावर बहिष्कार घालण्यासंदर्भातील मागणी देशात जोर धरु लागली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही आता या मागणीला पाठिंबा दिला असून यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी चीनला धडा शिकवण्यासाठी त्यांचे आर्थिक कंबरडे मोडायला हवे असे राऊत यांनी म्हटले आहे.