Breaking News

देशात कोरोनाचा सामूहिक संसर्गाचा धोका वाढला !

कोरोनाबाधितांची संख्या 3 लाखांच्या जवळ
नवी दिल्ली ः भारतात कोरोना रुग्णांची संख्या 3 लाखांच्या जवळ पोहचली असतांना देखील सामूहिक संसर्गाचा धोका नाकारणे चुकीचे असल्याचे मत आरोग्यक्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारकडून कोरोनाचा सामूहिक संसर्गाचा धोका असल्याचे नाकारण्यात येत आहे. मात्र देशातील परिस्थिती चिंताजनक होत असून, दिल्लीमध्ये दर चार नागरिकांमागे एक कोरोना रुग्ण सापडू लागला आहे. तर महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णांची संख्या 93 हजारांवर पोचहली असून, हा आकडा लवकरच एक लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात कोरोनाचा सामूहिक संसर्गाचा धोका वाढल्याचा इशारा आरोग्यक्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.
‘नॅशनल हेल्थ सिस्टम रिसोर्स सेंटर’चे माजी अध्यक्ष डॉ. टी. सुंदररमन कोरोनाच्या सामूहिक संसर्गाबद्दल बोलतांना म्हणाले की, जर तुम्ही एखादा परिसर संपूर्णत: सील करत आहात, याचा अर्थ तुम्हाला त्याचे मूळ सापडत नाही. जे हॉटस्पॉटच्या बाहेर राहत आहेत ते लोकं कम्युनिटी ट्रान्समिशनची बाब नाकारल्यामुळे त्यांच्या चाचण्या करू शकत नाही. यामुळे याचा प्रसार अधिक होईल. केंद्र सरकारद्वारे
सामूहिक संसर्गाचा धोका नाकारण्यात आला असला तरी, आयएमसीआरच्या एका सर्वेक्षणात कम्युनिटी ट्रान्समिशनची परिस्थिती एप्रिल महिन्यापासूनच सुरू झाल्याचे दिसून आले आहे. या सर्वेक्षणात असे अनेक रुग्ण सापडले होते ज्यांची कोणतीही पर्यटनाची पार्श्‍वभूमीही नव्हती. सामूहिक संसर्गाची बाब सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे जेणेकरून लोकं अधिक सावधगिरी बाळगतील, असे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. भारतात 24 मार्च रोजी लॉकडाउन लागू करण्यात आला होता. तेव्हा देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी होती. परंतु दोन महिने लागू करण्यात आलेल्या लॉकडाउननंतरही भारतातील करोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या जवळ पोहोचली आहे. भारतात आतापर्यंत 2 लाख 76 हजार 583 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर यामुळे 7 हजार 745 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात एप्रिल महिन्यापासूनच सामूहिक संसर्गाची परिस्थिती निर्माण झाली होती असे मत संसर्गजन्य रोगांच्या तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे. लोकांना याची माहिती न दिली गेल्याने लोकांमध्ये याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. याव्यतिरिक्त सरकारला चाचण्यांची संख्याही त्या प्रमाणात वाढवता आली नाही. तसेच चाचण्यांची संख्या कमी असल्याने सरकारला लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याचे कारण मिळाले, असेही तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. केंद्र सरकारकडून कोरोनाचा सामूहिक संसर्गाचा धोका नाकारण्यात आल्यामुळे त्यावर उपाययोजना करण्यात येत नाही. यासंदर्भात वेल्लोरच्या ख्रिस्तियन मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य जयप्रकाश मुलियिल म्हणाल्या की, देशात सामूहिक संसर्ग गेल्या काही काळापासून सुरू झाले आहे याची आपल्याला माहिती आहे. हे कोणत्याही परिस्थितीत कमी केले जावे याकडे लक्ष असणे गरजेचे आहे. आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची प्रक्रिया कामी येणार नाही. आता प्रत्येक पायरीवर कॉन्टॅक्ट ट्रेस करणे शक्य नाही. आता कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरूवात झाली आहे हे सरकारने स्वीकारायला हवे हे मी यापूर्वीही सांगितले होते.

कोरोना रुग्णांच्या संख्येचा वेग वाढला 
गेल्या 24 तासात भारतात कोरोनाचे सगळ्यात जास्त 9996 नवे रुग्ण आढळले असून  357  नागरिकांचा मृत्य झाला आहे. एकूण  रुग्ण संख्या  286579  झाली असून  सध्या  137448 सक्रीय कोरोना बाधित  आहेत  तर  141029 नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा   8102  वर  पोहचला आहे तर रुग्ण बरे होण्याचा दर 48.88 % झाला आहे. महाराष्ट्रात 24 तासांत  3 हजार 254 रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यानंतर राज्यातील करोनाबाधितांची एकून संख्या 94 हजार 041 इतकी पोहचली आहे.