Breaking News

कोरोनाची लक्षणे नसणार्‍यांनाच कार्यालयात बोलवा

सरकारी कर्मचार्‍यांसाठी केंद्र सरकारची नवी नियमावली 
नवी दिल्ली ः देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत असून, केंद्र सरकारने आपल्या कर्मचार्‍यांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार कोरोनाची लक्षणे नसणार्‍या कर्मचार्‍यांना कामावर बोलवू नका, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहे. 1 जूनपासून केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणून अनलॉक 1 सुरु केलं आहे. मात्र देशात कोरोना व्हायरसचा धोका आणखी वाढत असल्याचे दिसून येत आहे. अनलॉक 1 च्या पहिल्या टप्प्यात केंद्राने सरकारी कार्यालयात कर्मचार्‍यांना उपस्थित राहण्याबाबत सांगितले, मात्र गेल्या काही दिवसांत सरकारी कार्यालयात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचार्‍यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मंगळवारी केंद्र सरकारने याबाबत नवी गाईडलाईन जारी केली आहे. या नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार यापुढे ज्या कर्मचार्‍यांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाही अशांनाच कार्यालयात येण्याची परवानगी दिली आहे. अनलॉक 1 दरम्यान, देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना व्हायरसच्या एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 66 हजार 598 इतकी झाली आहे तर आतापर्यंत 7 हजार 466 लोकांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर, गेल्या 24 तासात कोरोनाचे 9 हजार 987 नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत.

केंद्र सरकारचे नवे नियम 
सर्दी, खोकला किंवा ताप असल्यास त्या कर्मचार्‍याने घरीच राहावे. कन्टेन्मेंट झोनमध्ये राहणार्‍या कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी घरुनच काम करावे. जोपर्यंत कन्टेन्मेंट झोन हटत नाही तोवर अशा कर्मचार्‍यांनी कार्यालयात येऊ नये. एका दिवसात 20 पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहू नये, यासाठी रोस्टर बनवण्यात यावं. बाकी कर्मचार्‍यांनी घरुन काम करावे. जर एका कॅबिनमध्ये दोन अधिकारी असतील तर त्यांनी एक दिवसआड कार्यालयात यावे. पूर्ण वेळ मास्क लावणे आवश्यक आहे. जे मास्क लावणार नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. सोशल डिस्टेंसिंगच पालन करणे गरजेचे. अधिकार्‍यांनी स्वत:च्या कॅम्प्युटरची सफाई स्वत: करावी. शक्य तेवढे दूर राहून बैठका आणि कामकाज करावे.