Breaking News

चीन नरमला!

- भारत-चीन सीमाप्रश्‍न
- शांततापूर्ण मार्गाने प्रश्‍न सोडवणार - चीन

नवी दिल्ली/प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन सीमेवर असलेल्या लडाख परिसरात चीनच्या कुरापती सुरू असल्याचे दिसून आले होते. तर दुसरीकडे चीनने सीमेवर सैनिकांची संख्याही वाढवली होती. तर भारतानेही जशासतसे उत्तर देत सीमेवर अधिक जवान तैनात केले होते. त्यानंतर शनिवारी भारत आणि चीनदरम्यान मिलिट्री कमांडर लेवल मीटिंग पार पडली. त्यानंतर चीनने संपूर्ण वादाचा शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढला जाणार असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी याबाबत माहिती दिली. ‘द्विपक्षीय चर्चेनंतर सीमावर्ती भागातील प्रश्‍न शांततामय मार्गाने सोडवण्यास दोघांची सहमती झाली,’ असे परराष्ट्र मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.
पूर्व लडाखमध्ये सुरू असलेला सीमावाद हा शांततापूर्ण मार्गाने सोडवला जावा यावर दोन्ही देशांच्या लष्कराच्या कमांडर्सचे एकमत झाले आहे. द्विपक्षीय संबंधांना अधिक दृढ करण्यासाठी भारत चीन सीमा क्षेत्रात शांततापूर्ण वातावरण आवश्यक आहे. दोन्ही पक्षांतर्फे डिप्लोमॅटिक संबंधांच्या 70 व्या वर्षाचीदेखील आठवण काढण्यात आली. लवकरच या प्रश्‍नाचा तोडगा काढून चांगले संबंध वाढवण्यावर भर देण्यात यावा, यावर दोन्ही देशांचे एकमत झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली. लष्कर आणि डिप्लोमॅटिक स्तरावर ही चर्चा यापुढेही सुरू राहणार आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. दरम्यान, भारत चीन सीमेवर मोठ्या प्रमाणात सैनिक आहे. त्यांना माघारी बोलवण्यावर काही चर्चा झाली अथवा नाही याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने मात्र कोणतीही माहिती दिली नाही. शनिवारी दोन्ही देशांच्या लेफ्टनंट जनरल स्तरावर चर्चा करण्यात आली. त्यापूर्वी स्थानिक कमांडर्सच्या स्तरावर चर्चा करण्यात आली होती. तसेच दोन्ही देशांच्या लष्करामध्ये चर्चांच्या 12 फेर्‍या झाल्या होत्या. याव्यतिरिक्त तीनवेळा मेजर जनरल स्तरावरही चर्चा करण्यात आली होती. परंतु त्या चर्चांनंतरदेखील कोणताही निर्णय होऊ शकला नव्हता.
--
भारताकडूनही जशास तसं उत्तर
दोन्ही देशांमध्ये गेल्या महिन्यात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 5 आणि 6 मे रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापटीची घटना घडली होती. तर 9 मे रोजी उत्तर सिक्कीम भागातही अशी घटना घडली होती. चीनच्या लष्कराने लडाखमध्येही अनेक ठिकाणी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर भारताने चीनच्या लष्कराला उत्तर देत अधिक जवान तैनात केले होते. तसेच सॅटलाईटवरून मिळालेल्या चित्रांनंतर चीनने एलएसीवरही मोठ्या प्रमाणात लष्करासाठी पायाभूत सुविधांची उभारणी केल्याचे दिसून आले होते.