Breaking News

लॉकडाऊन उठणार नाही!

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

- शेतकर्‍यांना फसविणार्‍यांवर कठोर कारवाई होणार
- वारकर्‍यांचा प्रतिनिधी म्हणून आषाढीच्या वारीला जाणार


मुंबई/खास प्रतिनिधी 
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुकद्वारे लाईव्ह संवाद साधला. यावेळी त्यांनी सध्याचा लॉकडाऊन 30 जूननंतर उठणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, हा लॉकडाऊन आहे तसा न राहता टप्प्याटप्प्याने यात काही सवलती दिल्या जातील, असेही नमूद केले. कोकणातील परिस्थितीसह राज्यातील अनलॉकबाबत आणि कोरोना नियंत्रणावरही त्यांनी भाष्य केले.
यावेळी ते म्हणाले की, कोरोनाची संख्या वाढत आहे. भाजी मंडईसह काही ठिकाणी होणारी गर्दी चिंतेचा विषय आहे. तुम्ही गर्दी कराल तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल. काही जिल्ह्यांमधून लॉकडाऊन वाढवण्याची मागणी आली आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. लॉकडाऊन हा शब्द वापरत नसलो तरी काही बंधने मात्र आपल्याला स्वत:वर घालावी लागतील, आपल्याला शिस्तीची जास्त गरज आहे. मुलांची, ज्येष्ठांची काळजी घेताना तरुण बाहेर पडत आहेत. त्यांना लक्षणे दिसत नसली तरी त्यांच्यामुळे अन्य लोकांना बाधा होऊ शकते. काळजी घेणे अपरिहार्य आहे, असे ते म्हणाले.
बोगस बियाणांच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, शेतकरी अपार कष्ट करुन बियाणे पेरतो आणि ते उगवत नाही. ज्यांनी शेतकर्‍यांना फसवले त्यांच्यावर कारवाई होणार. ज्यांनी शेतकर्‍यांना फसवले त्यांच्याकडून वसूली करुन नुकसानभरपाई देणार असल्याचे ठाकरे म्हणाले. शेतकरी मरमर राबून, अफाट मेहनत करून अन्न पिकवतोय आपल्यासाठी. त्या संदर्भात बी - बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी येणे हे दुर्दैवी. मेहनत करून पीक आले नाही तर काय करणार? मी शेतकरी दादाला सांगतो, काळजी करू नका, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, तुमच्यावतीने मी आषाढीच्या वारीला जाणार आहे. केवळ महाराष्ट्रासाठी नाहीतर अवघ्या देशासाठी, जगासाठी निरोगी आयुष्यासाठी साकडे घालणार आहे. वारकर्‍यांनो तुमचे आशीर्वाद पाठीशी राहू द्या, तुमचे आशीर्वाद घेऊन तुमचा प्रतिनिधी म्हणून विठुरायाचे आशीर्वाद घ्यायला जातोय.  मी वारी हेलिकॉप्टरमधून एरियल फोटोग्राफीद्वारे केली. मला त्या अथांग अवकाशातून सर्व विसरुन विठूमाऊलीच्या गजरात दंग झालेल्या वारकर्‍यांच्या रुपातून मला विठ्ठलाचे दर्शन झाले, विश्‍वरुप दिसले. वारकर्‍यांना सांगतो, नाईलाजास्तव वारीचा सोहळा आटोपशीर करावा लागतोय, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
--
उद्या कदाचित प्लाझ्मा थेरपीचा वापर करणारे आपले राज्य पहिले ठरेल. प्लाझ्मा कोणाचा वापरू शकतो? कोरोना होऊन बरे झालेत, त्यांच्या शरीरात न्टीबॉडीज तयार झाल्या आहेत, त्या रक्तगटानुरुप आपण वापरू शकतो. रक्तदानाप्रमाणे कोरोना बरा होऊन घरी गेलेल्या रुग्णांना विनंती आहे, प्लाझ्मादान करा, असेही ठाकरे म्हणाले.
--
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे- 
- अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नका.
- उरलेल्या शेतकर्‍यांना लवकरच कर्जमुक्ती दिली जाणार.
- रेमडेसिवीर आणि अन्य औषधे मोफत उपलब्ध करुन देणार.
- अर्थचक्राला गती दिल्यानंतर कोरोना संख्या वाढणारच आहे.
- उद्योजकांसाठी महाराष्ट्राचे दार उघडे, संकटामध्ये उद्योजकांना महाराष्ट्र आपला वाटतो. तुम्ही या पण भूमिपुत्रांना रोजगार द्या.
- शाळा सुरु करण्यापेक्षा शिक्षण सुरु करण्यावर भर