Breaking News

त्यांची सर्कस, तुमचा तमाशा का ?

महाराष्ट्रासारख्या लोकसंख्येने मोठ्या, आणि लोकसंख्येची घनता सर्वाधिक असलेल्या राज्यात आणि, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूरसारख्या महानगरांत कोरोना विषाणूचा विळखा खट्ट झालेला आहे. तथापि, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वेळीच, सावध आणि निर्णायक पाऊले उचलून कोरोनाचा उद्रेक आणि महाराष्ट्राला घशात घालण्याची त्याची चाल वेळीच रोखली आहे. परंतु, राज्यावर संकट असतानाही ज्यांनी राजकारण करण्याची एकही संधी सोडली नाही, त्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने मात्र या संकटात राज्य सरकारला साथ तर दिली नाहीच, उलटपक्षी सरकारला अडचणीत आणण्याचे उद्योग केलेत. राज्य सरकार राजकीय गर्तेत कसे फसेल, असेच षडयंत्र रचले. भाजपचे हे नौटंकी आणि सडकछाप राजकारण राज्यातील जनता उघड्या डोळ्याने पाहात आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे अतिशय चांगले काम करत आहेत. विदेशातून विमाने भरून कोरोना विषाणूग्रस्त माणसे जेव्हा देशात येत होती, तेव्हा ठाकरे यांनीच  सर्वात पहिल्यांदा राज्य लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. राज्यात जे काही विषाणूग्रस्त माणसे पोहोचलीत तीदेखील केंद्र सरकारचीच चूक आहे. विमानतळावरील स्कॅनिंगमध्ये दुबईहून येणार्‍या प्रवाशांचा समावेश केंद्र सरकारने केला नाही. परिणामी, दुबाईमार्गे कोरोनाग्रस्त मुंबईत घुसले, आणि हा कोरोना पार यवतमाळसारख्या शहरात जाऊन धडकला. अहमदाबाद येथे झालेल्या नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाचे पाहुणेदेखील केंद्र सरकारने मुंबईतच पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवले होते. त्या पाहुण्यांमार्फतदेखील कोरोनाचा शिरकाव मुंबईत झाला होता. एकूणच काय तर, महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा शिरकाव होणे, हे केंद्र सरकारचेच पाप असून, ते त्यांनी स्वीकारले पाहिजेत. बरे, या संकटाच्या परिस्थितीत महाराष्ट्राला मदतीचा हात देणे तर दूरच; परंतु राज्यपालांमार्फत राज्यात नानाविध राजकीय षडयंत्रे रचली गेली व ती पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले गेले. सत्ता गेल्याचे दुःख अद्यापही पचवू न शकलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तर राज्यपाल भवनावर मुक्कामी राहण्यास जाणे तेवढेच बाकी होते, इतक्या त्यांनी राजभवनाच्या चकरा मारल्यात. एखादा माजी मुख्यमंत्री राज्यपालांचे इतके कान भरवू शकतो, हेदेखील राज्याने पहिल्यांदाच पाहिले.
राज्यपाल भवन हे राजकारणाचा अड्डा बनल्याचे चित्र या राज्याला पहिल्यांदाच पहायाला मिळाले. फडणवीस व त्यांच्या कंपूने इतकी आदळापट करूनही राज्यातील ठाकरे सरकार स्थिर आहे, खंबीर आहे, आणि कोरोनाच्या संकटाशी हिमतीने लढते आहे. हे कदाचित केंद्रातील व राज्यातील भाजपला पहावत नसावे. म्हणून, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी महाविकास आघाडीच्या डोक्यावर वाढत्या कोरोना प्रादूर्भावाचे खापर फोडताना या सरकारला सर्कसची उपमा दिली. बरे, हे सरकार जर सर्कससारखे चालत असेल तर मग केंद्रातील सरकार म्हणजे तमाशा चालू आहे का? राज्यातील कोरोना पीडितांच्या संख्येने चीनला मागे टाकले हे खरे आहे; मग देशानेही जगात पाचवे स्थान पटकावले, त्याची जबाबदारी कुणी स्वीकारायची? अर्थातच ही जबाबदारी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी व जबाबदार मंत्री म्हणून राजनाथ सिंह यांचीच आहे. त्यामुळे इकडे सर्कस चालू असेल तर केंद्रात जो तमाशा सुरु आहे, त्याच्यामुळेच देश कोरोनाच्या विळख्यात वेगाने जात असून, आजपर्यंत साडेसात हजार देशवासीयांचे बळी गेले आहेत, त्याचे आत्मपरीक्षण भाजपने करायला हवे. खरे तर केंद्रातील सरकार हे रिंगमास्टरच्या हंटरवर चालते. राजनाथ सिंह यांनी बर्‍याच दिवसानंतर तोंड उघडले. कदाचित त्यांना त्यांच्या रिंगमास्टरनेच तसे करण्यास सांगितले असावे. जे स्वतः सर्कस मध्ये रिंगमास्टरच्या हंटरवर नाचत आहेत, ते दुसर्‍याला सर्कस म्हणत आहेत, हे जरा अतिच होत आहे. खरे तर महाराष्ट्रात तीन वेगवेगळ्या विचारधारेच्या राजकीय पक्षांचे सरकार आहे.
निवडणुकांच्या आखाड्यात जे पक्ष एकमेकांविरोधात लढलेत ते एक किमान समान कार्यक्रम घेऊन आणि सत्तेचा अहंकार डोक्यात गेलेल्या भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आले आहेत. खर्‍याअर्थाने लोकशाही ज्याला म्हणतात ती व्यवस्था महाराष्ट्रात आहेआणि लोकशाही पद्धतीने चालणारे हे राज्य सरकार चांगले काम करत आहे. कोरोना विषाणूबाबत राज्य सरकारने जे मॉडेल राबविले, त्याला मुंबई मॉडेल असे म्हणतात. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने या मॉडेलचे जाहीर कौतुक केलेले आहे. मुंबईची लोकसंख्या, तेथील माणसांची दाटी आणि तेथे हा रोग फैलावण्याची शक्यता, याबाबींचा विचार करता सरकारने वेळीच कठोर उपाययोजना केल्या नसत्या तर मुंबईची काय अवस्था झाली असती? तीच गत पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसारख्या मोठ्या महानगरांचीही झाली असती. परंतु, सरकारने वेळीच निर्णय घेतले, प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली, आर्थिक नुकसान सोसून लॉकडाऊनची अमलबजावणी केली म्हणून बरे झाले. अन्यथा, या राज्याचे काहीही खरे नव्हते. त्याबद्दल राज्यातील उद्धव ठाकरे सरकारचे कौतुक करायचे सोडून, राजनाथ सिंह सारखे ज्येष्ठ मंत्री ठाकरे सरकारवर टीका करत असतील तर त्यांची बुद्धी नाठी झाली, असेच म्हणावे लागेल. लॉकडाऊनमुळे कोरोना आटोक्यात आला असला तरी राज्याची आर्थिक परिस्थिती ढासाळलेली आहे. अशा परिस्थितीत केंद्राने राज्याला आर्थिक मदतीचे पॅकेज देऊन सावरायला हवे. परंतु, केंद्र मदत तर देत नाहीच; परंतु राज्यावर तोंडसुख घेऊन आपला अहंकार सुखावून घेत आहे. फडणवीससारख्या बोलघेवड्या नेत्यांचे ठीक आहे, पण राजनाथ सिंह यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याला अशी टीका करणे शोभते का?