Breaking News

शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये शिवसेनेच्या एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या आठ दिवसांपासून संबंधित नगरसेवकावर ठाण्यातील वेदांत या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. मृत नगरसेवकाची पत्नी, आई व भावालाही करोनाची लागण झाली होती. पत्नीला उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. तर, इतरांवर अजूनही उपचार सुरू आहेत.
संबंधित नगरसेवक दोनदा मिरा-भाईंदर महापालिकेत निवडून आले होते. शिवसेनेचे गटनेते म्हणून ते कार्यरत होते. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे ते निकटवर्तीय होते. स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. लॉकडाऊनच्या काळात विविध पक्षांचे राजकीय नेते व लोकप्रिय नेते आपापल्या मतदारसंघातील व वॉर्डातील जनतेला मदत करण्यासाठी प्रयत्नशील होते. या काळात त्यांचा अनेकांशी संपर्क आला. त्यातून अनेक पदाधिकारी व नेत्यांना करोनाची लागण झाली. राज्य सरकारमधील दोन मंत्र्यांनाही करोनाची लागण झाली होती. त्यांनी करोनावर मातही केली होती. मात्र, मिरा-भाईंदरमधील नगरसेवकाच्या मृत्युमुळं लोकांमध्ये मिसळून काम करणारे राजकीय नेते व लोकप्रतिनिधींच्या आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.