Breaking News

रामदेवबाबांचा गोलमाल!


योगगुरु रामदेवबाबा हे पक्के धंदेवाईक व्यक्तिमत्व म्हणावे लागेल. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचा धंदा कसा करून घ्यावा, हे या बाबांकडून शिकावे. 
आयुर्वेदिक औषधांच्या बाजारात या बाबांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीनेबर्‍यापैकी नाव कमावलेले आहे. आता त्यांनी कोरोना विषाणूच्या महामारीवर औषध शोधल्याचा दावा केला. हा दावा करताना रामदेव बाबा यांनी या औषधाच्या चाचण्या स्वतःच्याच पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये घेतल्याचे सांगितले. याच कंपनीचे एक संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी कोरोनावरचे कीटही पत्रकार परिषदेत दाखवले. या कीटमध्ये ‘कोरोनील’ व ‘श्‍वासरी’ अशी दोन औषधे असतील व त्याची किंमत 545 रुपये असेल, असे ते म्हणाले. या औषधाची माहिती देताना रामदेव बाबा व त्यांच्या कंपनीच्या एकाही प्रतिनिधीने औषधामागील वैद्यकीय वैधानिक पुरावे, त्याच्या क्लिनिकल ट्रायल यांची माहिती दिली नाही. मॉडर्न मेडिसीनमध्ये अशा क्लिनिकल ट्रायल व संशोधन जगापुढे दाखवावे, सादर करावे लागत असते. त्याचे पुरावे दाखल करावे लागतात, मग दावा करता येतो. परंतु, पतंजलीने असे कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. तरीही या बाबांनी त्यांचे औषध विकायला काढले असून, अनेक भाजपशासित राज्ये हे औषध विकू देत आहेत, आणि बाबा खोर्‍याने पैसा ओढायला मोकळे झाले आहेत. सुदैवाने महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने हा भंपकपणा येथे होऊ दिला नाही, त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आम्ही अभिनंदन करत आहोत. तूर्त आयुष मंत्रालयाने पतंजलीला पुरावे सादर करण्याचे आदेश दिले व त्यांच्या औषधाचा प्रसार व प्रचार करण्यास मनाई केली. एका अर्थाने तेही बरेच झाले म्हणायचे. पतंजलीने औषधांची माहिती देताना जयपूरमधील निम्स विद्यापीठात औषधाच्या चाचण्या घेतल्याचे सांगितले. या चाचण्यांमध्ये 100 कोरोना रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. पण त्यापैकी 95 रुग्ण चाचण्यांमध्ये सामील झाले. त्यातील 69 टक्के कोरोना रुग्ण तीन दिवसांत व सर्व रुग्ण एकूण सात दिवसांत बरे झाले, असे म्हटले होते. परंतु, द हिंदूया प्रतिष्ठित इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, 95 रुग्णांमधील 45 रुग्ण हे ट्रिटमेंट ग्रूपमध्ये होते तर अन्य 50 रुग्ण प्लॅसेबो ग्रूपपमध्ये होते. त्यामुळे प्रश्‍न असा निर्माण होतो, की पतंजलीने दिलेल्या माहितीवरून क्लिनिकल ट्रायलची संपूर्ण माहिती का मिळत नाही? त्याचबरोबर चाचण्यांचा एकूण कालावधी, रुग्ण स्त्री की पुरुष, प्रत्येक रुग्णाचा क्लिनिकल रिपोर्ट, ज्या मध्ये रुग्णाला अन्य आजार, रोग आहेत का याची माहिती, सुरक्षा अभ्यास, चाचण्यांची तपशीलवार माहिती, चाचण्यांच्या निकालाचा सांख्यिकी अभ्यास, साइड इफेक्ट्स, रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांचा केलेला अभ्यास व अन्य तपशील यांची माहिती पतंजली कंपनीने का दिलेली नाही? हेदेखील काही प्रश्‍न आहेत आणि या प्रश्‍नांची उत्तरे अद्याप तरी रामदेवबाबा यांनी दिलेली नाही. दुसरे म्हणजे, पतंजलीने आपल्या औषधावरचा एकही संशोधन प्रबंध जाहीर केलेला नाही. तो कोणत्याही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेला नाही व तसा तो वैद्यकीय क्षेत्रातील संशोधकांनाही आढळलेला नाही. त्यामुळे हे औषध म्हणजे रामदेवबाबांचा एकूणच सर्व गोलमाल आहे. दुसरी गंमत अशी, की पतंजलीने आपल्या प्रेस रिलीजमध्ये कोरोनील व श्‍वासरी संदर्भात पुढील प्रमाणे माहिती दिली आहेः कोरोना विषाणूचा मानवी शरीरात प्रवेश झाल्यानंतर तो श्‍वसनमार्गात जातो, तेथे तो अल्वेओईलवर हल्ला करून तो निकामी करतो, त्यानंतर हा विषाणू मानवी शरीरातील अन्य भागात उपद्रव देऊ लागतो. आमचे वर उल्लेख केलेले औषध विषाणूंना रोखते व शरीरात विषाणूंवर हल्ला करणार्‍या पेशींची संख्या वाढवून हा आजार रोखते. खरे तर असा दावा रोगप्रतिकारक औषधांमध्ये सर्रास आढळतोच आढळतो. परंतु, पतंजलीने कोणत्या पेशींची संख्या वाढते त्याचा उल्लेख केलेला नाही. थोडक्यात काय तर पतंजलीच्या औषधांची चाचणी एक हजार नव्हे, 100 नव्हे तर केवळ 95 रुग्णांवर झालेली आहे. भारतात अश्‍वगंधा, गुळवेल हे प्रतिकारकशक्ती वाढण्यासाठी सर्रास घेतले जाते. त्यामुळे पतंजली औषध विकसित केल्याच्या या दाव्यातून त्यांनी कोणताही वैज्ञानिक शोध लावला आहे, असे दिसत नाही. एखाद्या आजारावर औषध विकसित केल्याचे दावे करण्याचा पतंजलीचा हा पहिला प्रकार नाही. त्यांनी यापूर्वीही आपण शास्त्रीय संशोधनाच्या माध्यमातून औषधे विकसित करत आहोत असा दावा केला होता. 2016 मध्ये वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन पतंजलीने आपले आयुर्वेदिक मिशन हे संशोधनावर आधारित असून गेली 25 वर्षे सुमारे एक कोटीहून अधिक लोकांवर आमच्या संस्थेने संशोधन केल्याचा दावा केला होता. परंतु, त्यांची औषधी ही नवी संशोधने नसतात तर भारतात पूर्वपार चालत आलेल्या आयुर्वेदिक औषधांचाच फार तर कायापालट असतो. त्यामुळे रामदेवबाबांनी कोरोनासारख्या दुर्धर आजारावर काही तरी नवे औषध शोधले असे वाटून घ्यायचे काहीच कारण नाही. बाबा गोलमाल करत आहेत, आणि आपला धंदा वाढवत आहेत, एवढाच त्याचा अर्थ घ्यावा! बाकी औषध घ्यायचेच असेल तर ती प्रत्येकाची खासगी जोखीम ठरू शकते!!