Breaking News

रयत संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलवर बाबासाहेब भोस यांना पुन्हा संधी

- श्रीगोंद्यासह नगर जिल्ह्याचा रयत संस्थेत दबदबा कायम

- प्राचार्य तुकाराम कन्हेरकर यांनाही मॅनेजिंग काऊन्सिलवर संधी
माध्यमिक विभागाच्या सहसचिवपदी  प्राचार्य संजय नागपुरे यांची नियुक्ती 

प्रमोद आहेर/येळपणे
रयत शिक्षण संस्थेच्या बहुचर्चित असलेल्या विविध पदांवरच्या नेमणुका नुकत्याच  करण्यात आल्या. रयत शिक्षण संस्थेच्या सर्वोच्च असणाऱ्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी श्रीगोंद्यामधील माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब भोस आणि महादजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम कन्हेरकर आणि  माध्यमिक विभागाच्या सहसचिवपदी  प्राचार्य संजय नागपुरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
महादजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम कन्हेरकर यांनी चांडगाव येथील शाखेच्या उभारणी तसेच घोगरगाव , महादजी शिंदे विद्यालय आणि अहमदनगर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालय, शाखांच्या मुख्याध्यापक म्हणून काम केले आहे. श्रीगोंदे येथील महादजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलच्या इमारतीची उभारणी मध्ये भूमिका पार पाडली आहे. यापूर्वी त्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये आजीव सदस्य म्हणूनही काम केलेले आहे अशा उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना मॅनेजिंग कौन्सिल मध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदे येथील विविध शाखांचे संरक्षक व पाठीराखे म्हणून बाबासाहेब भोस हे अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्यांनी जनरल बॉडी सदस्य म्हणूनही काम केलेले आहे. श्रीगोंदे येथील महादजी शिंदे विद्यालय व महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय यांच्या स्थानिक स्कूल कमिटी मध्ये त्यांनी काम केले आहे. या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेचे विविध प्रकल्प राबवण्यामध्ये बाबासाहेब भोस यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. तसेच श्रीगोंदे येथे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात यापूर्वी प्राध्यापक म्हणून कार्यरत आणि सध्या रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे इन्स्पेक्टर म्हणून जबाबदारी पार पाडणारे प्राचार्य संजय नागपुरे यांची रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विभागाच्या सहसचिवपदी निवड झालेली आहे. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेमध्ये निर्णयप्रक्रियेत महत्त्वाच्या असणाऱ्या मॅनेजिंग कौन्सिल मध्ये  प्रतिनिधीत्व या दोन मान्यवरांना करता येणार आहे. यातील महत्त्वाच्या पदांवर श्रीगोंद्याशी निगडित मान्यवरांची निवड झाल्यामुळे श्रीगोंदे परिसर व अहमदनगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.