Breaking News

भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे चीन, पाकिस्तानकडे - धक्कादायक अहवाल आला समोरस्टॉकहोम/ वृत्तसंस्था
भारतापेक्षा चीन आणि पाकिस्तानकडे जास्त अण्वस्त्रे उपलब्ध आहेत. युद्ध आणि शस्त्रास्त्रांची माहिती ठेवणार्‍या स्वीडनमधील एका आघाडीच्या थिंक टॅँकने प्रकाशित केलेल्या नवीन वार्षिक पुस्तकातून ही माहिती समोर आली आहे.
सध्या पूर्व लडाखमध्ये चीनने केलेल्या घुसखोरीमुळे तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांकडून हा वाद चर्चेच्या माध्यमातून सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रीसर्च संस्थेच्या ईयरबुक 2020 नुसार चीनच्या शस्त्रागारात 320 अण्वस्त्रे तर, पाकिस्तानकडे 160 आणि भारताकडे 150 अण्वस्त्रे उपलब्ध आहेत. जानेवारी 2020 पर्यंतच्या अण्वस्त्रांची ही संख्या आहे. एसआयपीआरआय संस्थेच्या अहवालानुसार, 2019 च्या सुरुवातीला अण्वस्त्रांच्या बाबतीत हे तीनही देश याच क्रमवारीमध्ये होते. त्यावेळी चीनकडे 290, पाकिस्तानकडे 150 ते 160 आणि भारताकडे 130 ते 140 दरम्यान अण्वस्त्रे उपलब्ध होती. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली असताना, अण्वस्त्रांची ही संख्या समोर आली आहे. लडाख ते उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशपर्यंत दोन्ही देशांनी सीमेजवळ आपले सैन्य आणून ठेवले आहे. चीन आपल्या अण्वस्त्र शस्त्रागाराचे आधुनिकीकरण करीत असून, जमीन, समुद्र आणि हवेतून अण्वस्त्र डागण्याची क्षमता अधिक विकसित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रीसर्च संस्थेच्या ईयरबुकमध्ये म्हटले आहे.